Air India Bomb Threat: मुंबई (Mumbai)हून तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) ला जाणारे एअर इंडिया (Air India) च्या विमानाला बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाली. त्यानंतर या विमानाला आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. सकाळी साडेसात वाजता विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सहा मिनिटांनी संपूर्ण विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली. सर्व प्रवाशांना विमानाच्या बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली. परंतु, या विमानात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. विमानतळावरील सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत.
हा फसवा कॉल असल्याचे विमानतळ व्यवस्थापनाचे मत आहे, परंतु सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे. विमानाचे विलगिकरण करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. विमान तिरुअनंतपुरम विमानतळाजवळ येताच पायलटला बॉम्बची धमकी मिळाली. यावेळी विमानात 135 प्रवासी होते. ही धमकी कोणी आणि कशी दिली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. (हेही वाचा -Delhi-Varanasi IndiGo Flight Bomb Threat: टेक ऑफ आधी इंडिगो विमानात आढळली बॉम्ब ठेवल्याची चिठ्ठी; विमान थांबवून शोध मोहीम सुरू)
Full emergency declared at Thiruvananthapuram airport after bomb threat on Air India flight from Mumbai: Airport sources
— Press Trust of India (@PTI_News) August 22, 2024
दिल्लीतील अनेक रुग्णालयांना बॉम्बच्या धमक्या -
मंगळवारी (20 ऑगस्ट), एम्स आणि सफदरजंगसह अनेक रुग्णालये आणि दिल्लीतील एका मॉलमध्ये बॉम्बची धमकी देणारे ईमेल आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईमेलमध्ये एम्स, सफदरजंग, अपोलो, मूलचंद, मॅक्स आणि सर गंगाराम हॉस्पिटलसह सुमारे 50 सरकारी आणि खाजगी रुग्णालयांची यादी होती. दुपारी 12:04 वाजता पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले होते, 'आम्ही तुमच्या इमारतीत अनेक स्फोटके पेरली आहेत. हे काळ्या पिशवीत ठेवण्यात आले आहेत. काही तासांत बॉम्बचा स्फोट होणार आहे. तुम्ही रक्ताने माखले जाल, तुमच्यापैकी कोणीही जगण्यास पात्र नाही. इमारतीतील प्रत्येकजण आपला जीव गमावेल. आज तुमचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस असेल.'
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या धमकीच्या ईमेलचा नमुना रुग्णालये, शाळा, विद्यापीठे आणि इतर सरकारी इमारतींना पाठवलेल्या पूर्वीच्या ईमेलसारखाच आहे ज्यात संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने तारीख नमूद केली होती.