TB 20 Aircraft Crashed: उत्तर प्रदेशमध्ये टीबी 20 विमान कोसळून एका प्रशिक्षणार्थी पायलटचा मृत्यू
TB 20 Aircraft Crashed (Photo credit- ANI)

TB 20 Aircraft Crashed: उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये (Azamgarh) टीबी 20 एअरक्राफ्ट्स कोसळल्याची (TB 20 Aircraft Crashed) घटना घडली. या अपघातात प्रशिक्षणार्थी पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. हे विमान इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकेडमीचं (IGRUA) होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात पायलटचा मृतदेह सापडला. दुर्घटनाग्रस्त विमान पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. आझमगडमधील सरायमीर भागातील कुसहां गावाजवळ ही दुर्घटना घडली. (हेही वाचा -Taj Mahal Reopens: ताजमहाल पर्यटकांसाठी आजपासून पुन्हा खुलं; कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 'ही' नियमावली बंधनकारक)

या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, सकाळी 11 च्या सुमारास एक टू-सीटर चार्टर्ड एयरक्राफ्ट टीबी 20 कोसळले. या दुर्घटनेत एका पायलटचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा पायलट अद्याप बेपत्ता आहे. प्रशासनाकडून या पायलटचा शोध सुरू आहे. स्थानिकांनी हे विमान शेतात कोसळताना तसेच विमानातून दोन जणांना उडी मारताना पाहिलं होतं. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.