लवकरच भारतात उपलब्ध होणार ब्लास्ट प्रुफ सिलिंडर; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ठ्ये
ब्लास्ट प्रुफ सिलिंडर (संग्रहित -संपादित प्रतिमा)

स्वयंपाक घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन अपघात घडल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो. कित्येकांची घरे अशा प्रकारच्या स्फोटात उद्धस्त झाली आहेत. म्हणूनच सिलिंडरचा वापर करताना अतिशय काळजी घ्यावी लागते. मात्र आता यावर एक तोडगा काढण्यात आला आहे. भारतामध्ये लवकरच ब्लास्ट प्रुफ सिलिंडर  (Blast-Proof Cylinder) विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड, एलपीजी रिटेलर आणि टाइम टेक्नोप्लास्ट लिमिटेड यांनी मंगळवारी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या ब्लास्ट प्रुफ सिलिंडरची घोषणा केली. गो गॅस ईलाईट (GoGas Elite) असे नाव या ब्रँडला देण्यात आले आहे.

यावेळी टाइम टेक्नोप्लास्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जैन म्हणाले, ‘आमच्याद्वारे तयार केलेले सिलिंडर हे गॅस फायबरपासून बनलेले आहेत, ज्यांचे वजन हे स्टीलच्या सिलिंडरपेक्षा निम्मे आहे. हे लाइटवेट, पारदर्शक आहे. अशा प्रकारचे सिलिंडर तयार करण्यासाठी आग आणि उष्णता प्रतिरोधक सामग्रीचा वापर केला आहे. ते यूव्ही-संरक्षित आहेत आणि त्यांच्यावर गंजही चढणार नाही. परंपरागत एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत यांचे 100% पुनर्नवीनीकरण करणे शक्य आहे. अशा प्रकारचे कोणतेही एलपीजी गॅस सिलिंडर  बाजारात येण्यापूर्वी त्यामधील 14 क्वालिटी पाँईंटची खात्रीशीर तपासणी करूनच त्यास प्रमाणपत्र दिले जाते.

(हेही वाचा: घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींत घट, सर्वसामान्यांना मोठा दिलासा)

हे नवीन सिलिंडर पारंपरिक सिलिंडरच्या तुलनेत 20 ते 25 टक्के महाग असणार आहे. तसेच स्टीलच्या सिलिंडरच्या तुलनेत ते 4 वर्षे जास्त टिकणार आहे. म्हणजेच स्टीलचे सिलिंडर हे 16 वर्षे टिकते तर हे नवे  ब्लास्ट प्रुफ सिलिंडर 20 वर्षे टिकणार आहे. अशा प्रकारच्या सिलिंडरमुळे भारतीय स्वयंपाकघरे ही अजून सुरक्षित बनावी असा कंपनीचा उद्देश आहे. सध्या अशा प्रकारचे सिलिंडर उपलब्ध करून देणारी भारतातातील ही एकमेव कंपनी आहे, 28 देशांमध्ये ही कंपनी आपले सिलिंडर निर्यात करते.