मोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी 'लावा' (Lava) आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने पुढील 5 वर्षात भारतात 800 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लावा इंटरनॅशनलकडून शुक्रवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
फायनॅन्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय यांनी सांगितले की, 'उत्पादनाच्या डिझायनिंग क्षेत्रात चीनमध्ये 600 ते 650 कर्मचारी आहेत. आम्ही आता हे काम भारतातून करणार आहोत. उत्पानांच्या विक्रीची आवश्यक ती गरज भारतातील कारखान्यातून पूर्ण केली जाईल. आम्ही यापूर्वी चीनमधून आमचे फोन जगभरात वितरीत करत होतो. मात्र, आता आम्ही ते भारतातून करणार आहोत.' (हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीच्या पॅकेज बाबत पुनर्विचार करावा- राहुल गांधी)
दरम्यान, सध्या चीनमध्ये व्यवसाय करत असलेल्या अमेरिकन कंपन्यांना भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सरकारने आतापर्यंत 1 हजार पेक्षा अधिक कंपन्यांशी यासंदर्भात संपर्क साधला आहे. तसेच त्यांना भारतात आपला व्यवसाय सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. लावा कंपनी भारतात करत असलेली गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.