Jaipur Basement Tragedy: गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) राजस्थान (Rajasthan) ची राजधानी जयपूर (Jaipur) मध्ये हाहाकार माजला आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानक, पोलीस ठाणे, रुग्णालयासह अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. मुसळधार पावसामुळे जयपूरमध्ये दिल्लीसारखी दुर्घटना (Delhi Coaching Centre Tragedy) घडली आहे. येथे विश्वकर्मा परिसरात पावसाच्या पाण्याने तळघर तुडुंब भरले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून याठिकाणी तळघरातील पाणी काढण्याचे काम सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, तळघरात पाणी घुसल्याने दोन प्रौढ आणि एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू झाल्यानंतर सात तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात आले. जयपूरमध्ये पावसामुळे तळघर जलमय झाले होते. पीडितांना वेळेत बाहेर पडता आले नाही. त्यामुळे तुडूंब भरलेल्या पावसाच्या पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (हेही वाचा -Delhi Coaching Centre Deaths: दिल्ली कोचिंग दुर्घटनेची गृहमंत्रालयाची समिती करणार चौकशी, 30 दिवसांत अहवाल सादर करणार)
राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस -
राजस्थानमध्ये मान्सूनच्या पावसाने जोर धरला आहे. बुधवारी (31 जुलै) करौलीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. हवामान केंद्र, जयपूरच्या मते, बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या कालावधीत करौली येथे सर्वाधिक 80 मिमी पाऊस झाला, तर पश्चिम राजस्थानच्या बारमेरमधील गद्रा रोड येथे 32.5 मिमी पावसाची नोंद झाली. (हेही वाचा - Drishti IAS Sealed: विकास दिव्यकीर्ती यांचे तळघरात सुरु असलेले आयएएस कोचिंग सेंटर MCD कडून सील)
तथापी, फतेहपूरमधील पावसामुळे मुख्य बसस्थानक, नदीन ली प्रिन्स हवेली आणि मांडवा रोड अंडरपास कल्व्हर्टसह सखल भागात पाणी साचले आहे. जयपूरमध्ये तळघरात पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. कारण, गेल्या आठवड्यात दिल्लीतील राजेंद्र नगर परिसरातील एका कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.
राजस्थानमध्ये पावसामुळे भीषण परिस्थिती -
राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे काही ठिकाणांहून घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. तर काही ठिकाणी रस्ता खचला आहे. जयपूरच्या जामडोली भागात अचानक रस्ता खचल्याने स्कूल बस आणि मुलांना घेऊन जाणारी व्हॅन अडकली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.