अजूनही निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी झाली नाही. ती घटना आठवून आजही संपूर्ण देश हळहळतोय. मात्र राजधानी दिल्लीने पुन्हा एकदा एकट्या स्त्रिया सुरक्षित नाहीत हे दाखवून दिले आहे. नुकतीच दिल्लीत निर्भया प्रकाराचीच पुनरावृत्ती झाल्यासारखी एक घटना घडली आहे. एका 42 वर्षाच्या महिलेवर NH 8 वर धावत्या रिक्षात सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच रिक्षाचालकांना अटक केली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे स्त्रियांनी घराबाहेर एकटे पडायचे का नाही? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
तर, 2013 साली या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. पती ज्या कंपनीत काम करत होता, त्या कंपनीमध्ये काही आर्थिक गोष्टींवर बोलणी करण्यासाठी ही महिला निघाली होती. शनिवारी दुपारी या महिलेने नाखरोला चौक येथून आयएमटी मानेसर येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षात आधीच अंकित या चालकासह दीपक नावाची व्यक्ती बसली होती. त्यानंतर मानेसर येथे जाण्याऐवजी अंकितने रिक्षा दीपिकच्या रूमकडे नेली. त्या रूमवर आधीच एक व्यक्ती उपस्थित होती. या तिघांनी तिला ओढत रूमवर नेवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. (हेही वाचा : नराधमाने वहिनी आणि पुतणीचा खून करून मृतदेहावर केला बलात्कार)
रात्री 9 च्या सुमारास, अंकित आणि दीपक यांनी त्या महिलेला NH 8 वरील रामपुरा मोड येथे आणखी दोन रिक्षा चालकांकडे सोपवले. त्यानंतर त्या दोघांनी अजून एका मित्राला बोलावून घेतले. त्यांचा मित्र एक तास रिक्षा फिरवत होता आणि ते दोघे मागच्या सीटवर धावत्या रिक्षेत महिलेवर बलात्कार करत होते. शेवटी रात्री उशिरा त्यांनी महिलेला रामपुरा फ्लायओव्हर खाली, एका ढाब्याच्या मागे सोडून दिले. रविवारी सकाळी जेव्हा लोकांनी तिला पहिले तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली, आणि तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास सुरु केला. शेवटी अंकित, दीपक, महिपाल, अजित आणि सुन्नू या पाच रिक्षा चालकांना अटक केली. हे सर्व युवक 24 ते 27 या वयोगटातील आहेत.
याआधीही 29 मे 2017 मध्ये एका 19 वर्षीय युवतीवर मानेसर येथेच तीन रिक्षा चालकांनी धावत्या रिक्षामध्ये बलात्कार केला होता. यावेळी तिच्या 8 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता.