Delhi Shocker: स्कूटीला हात लावल्याने चढला पारा; दिल्लीत रागाच्या भरात 20 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या
Representational Image. (Photo Credit- IANS)

Delhi Shocker: पूर्व दिल्लीच्या समसपूर भागात (Samaspur Village) रोड रेज (Road Rage) च्या घटनेत, एका 20 वर्षीय तरुणाचा दारूच्या दुकानाबाहेर छातीवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. निखिल शर्मा (वय, 20 वर्षे) असे मृताचे नाव असून तो पटपरगंज गावातील (Patparganj Village) रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आणि त्याच्या मित्राने रविवारी दारूच्या दुकानाजवळ आरोपीच्या स्कूटीला हात लावला. त्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. दारू खरेदी करून दोघे परतत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या व्यक्तीशी त्याचे भांडण झाले होते, तो काही वेळाने आपल्या एका साथीदारासह परतला. त्यापैकी एकाने मृत निखिलच्या छातीवर धारदार वस्तूने वार केले. या हल्ल्यात निखिल गंभीर जखमी झाला. (हेही वाचा - Delhi Shocker: पाळीव कुत्रा भुंकल्याने तरुणाला आला राग, संतापलेल्या व्यक्तीने शेजारच्यांना केली मारहाण, पहा व्हिडीओ)

पोलिस उपायुक्त (पूर्व) प्रियंका कश्यप यांनी सांगितले की, रविवारी रात्री 8.42 वाजता पांडव नगर पोलिस स्टेशनला माहिती मिळाली की, मारामारीत जखमी झालेल्या तरुणाला त्याच्या मित्राने खिचडीपूर येथील एलबीएस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

कश्यप यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, समसपूर येथील एका दारूच्या दुकानाजवळ एका स्कूटरला स्पर्श करण्यावरून पीडित तरुणी आणि त्याच्या मित्राचा अज्ञात स्कूटरस्वाराशी वाद झाला होता. या घटनेनंतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि घटनांचा क्रम शोधण्यासाठी गुन्ह्याच्या ठिकाणी बसवलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.