Kirari Fire (Photo Credits: ANI)

Delhi Fire: दिल्लीच्या किरारी (Kirari)  भागात मध्यरात्री एका कापड गोदामाला (Cloth Godown) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मध्यरात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू होते. त्यानंतर काही वेळाने अग्निशमन पथकाला आग विझवण्यात यश आलं. आगीमुळे जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.

आग लागलेली इमारत तीन मजली असून या इमारतीच्या खालच्या मजल्यावर कपड्याचे गोडाऊन होते. इमारतीला आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेत 9 जणांचा बळी गेला आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. (हेही वाचा - मुंबई: विलेपार्ले परिसरातील 13 मजली इमारतीला भीषण आग)

मागील आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दिल्लीतील अनाज मंडी येथे लागलेल्या आगीत 43 जणांचे प्राण गेले होते. तर अनेकजण जखमी झाले होते. तसेच रविवारी संध्याकाळी मुंबईतील विलेपार्ले येथे एका 13 मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.