Building Collapse in Delhi (PC - ANI)

Building Collapse in Delhi: दिल्लीतील नमी आझाद मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी चार मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. सकाळी 8.30 च्या सुमारास झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत, तर काही लोक अडकल्याची भीती आहे. इमारत कोसळून जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अद्याप कोणाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी 8.30 च्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन पथकाने घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. इमारत कोसळल्यानंतर अडकलेल्या चार मजुरांना वाचवण्यात यश आले आहे, तर काही लोक अजूनही अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जुनी दिल्लीतील बडा हिंदुराव पोलिस स्टेशन अंतर्गत आझाद मार्केटच्या शीशमहल परिसरात बांधकाम सुरू असलेली चार मजली इमारत कोसळली. सुमारे महिनाभरापासून या इमारतीचे बांधकाम सुरू होते. ही इमारत कोसळल्याने आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले आहे. त्यातही अनेक लोक गाडले गेले आहेत. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या मालकाचे नाव अजय जैन असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Biggest Car Thief: सर्वात मोठा कार चोर Anil Chauhan पोलिसांच्या ताब्यात; आतापर्यंत चोरल्या आहेत 5,000 हून अधिक गाड्या, 180 गुन्हे दाखल)

या घटनेची माहिती देताना उत्तर जिल्ह्याचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर चार जण जखमी झाले आहेत. दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितले की, राजधानीच्या आझाद मार्केट परिसरात इमारत कोसळण्याच्या ठिकाणी अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून बचावकार्य सुरू आहे. त्याचवेळी या इमारतीचे बांधकाम बेकायदेशीरपणे केले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.