उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर (UP Muzaffarnagar) जिल्ह्यातील पीडितेने बलात्काराचा खटला (Rape Case) मागे न घेतल्याने 4 आरोपींनी पीडितेवर अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याची घटना घडली आहे. उन्नाव तसेच हैदराबाद बलात्कार प्रकरण ताजे असताना वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यावरून देशात आरोपींना कायद्याची भीती राहिली नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 30 वर्षीय पीडितेने बलात्काराचा खटला मागे घ्यावा, असे आरोपींचे म्हणणे होते. परंतु, पीडितेने त्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी पीडितेवर अॅसिड हल्ला केला.
या अॅसिड हल्ल्यात पीडित महिला 30 टक्के भाजली आहे. पीडितेवर मेरठमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील 4 आरोपींनी बुधवारी रात्री जबरदस्तीने महिलेच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्यावर अॅसिड फेकले, अशी माहिती शाहपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी गिरिजा शंकर त्रिपाठी यांनी दिली आहे. (हेही वाचा - उन्नाव येथील दुष्कर्माविरोधात सफदरजंग रुग्णालयाबाहेर एका अंदोलनकर्त्या महिलेचा 6 वर्षीय चिमुकलीला जाळण्याचा प्रयत्न)
आरिफ, शाहनवाज, शरीफ आणि आबिद, अशी या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी कासेरवा गावचे रहिवासी आहेत. सध्या हे चारही आरोपी फरार आहेत. यासंबंधी पोलिस अधिक तपास करत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.