'आई' शब्दाला काळिमा; आईच्या संमतीने तीन वर्षाच्या मुलीवर, दोघांचा तब्बल 10 दिवस लैंगिक अत्याचार
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

तीन वर्षाच्या मुलीवर आईच्या संमतीने, तब्बल 10 दिवस लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत 32 वर्षीय तरुण, त्याचा साथीदार आणि या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांच्याविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत (Pocso Act) गुन्हा नोंदवला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे. मुळची आंध्र प्रदेशची असलेल्या या महिलेचे लग्न तामिळनाडूच्या युवकाशी झाले होते. आता आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी ही महिला आंध्र प्रदेशमध्ये आलेली असताना ही घटना घडली आहे.

14 मार्च रोजी ही महिला आपल्या मुलीला घेऊन गायब झाली. नवऱ्याने दोन दिवस शोध घेतला आणि त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिच्या आईवडिलांकडे चौकशी केली, मात्र ती तिथे नसल्याचे आढळले. 26 मार्चला ही महिला परत आपल्या घरी आली. त्यानंतर मुलगी आजारी पडल्याने तिला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तिथे तपासणीमध्ये या मुलीचा लैंगिक छळ झाला असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना दिली. (हेही वाचा: धक्कादायक: पंढरपूर येथे शिक्षकांकडून चार मूकबधिर मुलींचा लैंगिक छळ)

पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले व चौकशी सुरु केली. पोलिसांच्या धाकामुळे या महिलेने सर्व काही सांगून टाकले. तर ही महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आंध्र प्रदेश येथे गेली होती. तिथे तिचा प्रियकर आणि अजून एक व्यक्तीकडून या 3 वर्षाच्या लहान मुलीचा लैंगिक छळ होण्यास सुरुवात झाली. हे कृत्य तब्बल 10 दिवस चालले आणि यासाठी या महिलेची पूर्णतः संमती होती. आता पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.