कॉंग्रेस सत्तेत आल्यास 2020 पर्यंत 22 लाख सरकारी नोकऱ्या देऊ, राहुल गांधी यांची घोषणा
राहुल गांधी (Photo Credit- Twitter)

2014 साली सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या भूमिकेवर भर दिला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ही घोषणा फक्त घोषणाच राहिलेली दिसत आहे. अशात आता जर केंद्रात काँग्रेसचे सरकार आले तर एका वर्षाच्या कालावधीत 22 लाख युवकांना सरकारी नोकरी देण्यात येईल. पुढील वर्षाच्या 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख सरकारी पदे भरण्यात येतील असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिले आहे. रविवारी आर्थिक वर्षाच्या शेवटी, रात्री राहुल गांधी यांनी ट्विट करत ही घोषणा केली.

सध्या बेरोजगारी ही देशातील फार मोठी समस्या आहे. गेल्या दोन वर्षांत भारतातील बेरोजगारीचा दर कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राफेल, नोटाबंदी, जीएसटीच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. आता रोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना राहुं गांधी यांनी ही घोषणा करून मोठी खेळी खेळली आहे. (हेही वाचा: राहुल गांधी लोकसभा निवडणुक दोन मतदार संघातून लढवणार, काँग्रेस पक्षाकडून अधिकृत घोषणा)

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात शहरी रोजगार गॅरेंटी योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत किमान 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये 4 ते 10 हजार रुपये महिना उत्त्पन्न मिळणार आहे. दरम्यान नुकतेच 2019 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरीब कुटुंबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणार, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. याचा थेट फायदा देशातील 5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 25 कोटी जनतेला होणार असल्याचा दावा काँग्रेस अध्यक्षांनी केला.