Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

हरियाणातील कर्नाल येथील हरिसिंग पुरा गावात एका खाजगी शाळेच्या वर्गात विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या केली. ही संपूर्ण घटना शाळेच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरसिंगपुरा गावातील संस्कार भारती या खासगी शाळेत गुरुवारी बारावीचे प्रात्यक्षिक होते. सकाळी नऊच्या सुमारास परीक्षा सुरू होणार होती. परीक्षेदरम्यानच बारावीच्या विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्याशी वाद झाला. दोन विद्यार्थ्यांमधील वाद इतका वाढला की, एका विद्यार्थ्याने दुसऱ्याची चाकूने वार करून हत्या केली. ही घटना घडली त्यावेळी वर्गात मुले उपस्थित होती. गुन्हा करून आरोपी विद्यार्थ्याने घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा - Pune Rape Case: पुण्यात 11 वर्षीय मुलीवर भरदिवसा शाळेत घुसून अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार; आरोपीचा शोध सुरू)

जखमी विद्यार्थ्याला वर्गात रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून शाळेच्या आवारात एकच खळबळ उडाली. विद्यार्थी इकडे तिकडे धावू लागले. गंभीर जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी घारौंडा येथील कम्युनिटी सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथून डॉक्टरांनी त्याला कर्नाल येथे रेफर केले. कर्नाल येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, याआधीही या दोन विद्यार्थ्यांचे भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या वैमनस्यातून विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. शाळेत झालेल्या हत्येनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा तपास सुरू केला. त्याचबरोबर खबरदारी म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताचं डीएसपी मनोज कुमार मोठ्या पोलीस फौजफाट्यासह गावात पोहोचले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. शाळेतील या घटनेची काही छायाचित्रे शाळेच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर गावात दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गावात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे डीएसपी मनोज कुमार यांनी सांगितले. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.