देशात बँक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेलाही (AIIMS) (All India Institutes of Medical Sciences) बसला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामधील ‘एम्स’च्या दोन बँक खात्यांमधून बनावट धनादेशांच्या (क्लोन्ड चेक) माध्यमातून तब्बल 12 कोटी रुपये लंपास करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा बँक घोळाटा मागच्या महिन्यात झाला असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे हा घोटाळा उघड झाल्यानंतर एसबीआयच्या देहरादून आणि मुंबईतील शाखेतून आणखी 29 कोटी रुपये बनावट धनादेशांच्या माध्यमातून पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व प्रकारानंतर AIIMS ने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर घोटाळेखोरांनी एसबीआयच्या देहरादून शाखेतून 20 कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तसेच मुंबईतील शाखेमधून 9 कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा - PMC बँक खातेधारकांना आता 10 हजार ऐवजी 25 हजार रुपये काढता येणार, RBI कडून निर्णय जाहीर)
एम्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा घोटाळा करताना भामट्यांनी बनावट धनादेशांचा वापर केला. हे बनावट धनादेश बँकेच्या पडताळणी यंत्रणेला ओळखता आले नाहीत. तसेच ‘यूव्ही रे टेस्ट’मध्येदेखील हे चेक उत्तीर्ण झाले. भामट्यांनी हा घोटाळ करण्यासाठी वापरलेले धनादेश सध्या एम्सकडे आहेत. या सर्व घोटाळ्याती माहिती एम्सने आरोग्य मंत्रालयाला दिली आहे.
हेही वाचा - PMC बँक घोटाळाप्रकरणी संचालक सारंग आणि राकेश वाधवान अटक, 6500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता
दरम्यान, बँकेच्या हलगर्जीपणामुळे हा घोटाळा झाला असल्याचा आरोप एम्सने केला आहे. तसेच चोरीला गेलेले पैसे बँकेने आपल्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी एम्सने केली आहे.