धक्कादायक! जयपूरमध्ये 10 वर्षाच्या मुलीने पेनवरून झालेल्या भांडणातून केली आठवीच्या मुलीची हत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

जयपूरमध्ये  (Jaipur) 10 वर्षाच्या मुलीने पेनवरून झालेल्या भांडणातून एका आठवीच्या विद्यार्थींनीची हत्या (Murder) केली आहे. जयपूरमधील चाकसू परिसरात बुधवारी ही मुलगी मृतावस्थेत आढळली होती. ही मुलगी परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. मृत विद्यार्थींनीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. त्यानंतर गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह सापडला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात मृत मुलीच्या शाळेतील एका 10 वर्षीय मुलीने पेनवरून झालेल्या भांडणात तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  (हेही वाचा - पुन्हा हादरले उत्तर प्रदेश; उन्नाव आणि हैदराबादनंतर फतेहपूरमध्ये युवतीवर बलात्कार करून जिवंत जाळले; पुतणीवर अत्याचार करून आरोपी काका फरार)

10 वर्षीय मुलीने बुधवारी आठवीत शिकणाऱ्या मुलीचा पेन हिसकावून घेतला होता. त्यामुळे या दोघींमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर काही वेळात या दोघींमधील वाद मिटला. परंतु, पीडित मुलगी घरी जात असताना पुन्हा या दोघींमध्ये वाद झाला. या भांडणामध्ये 10 वर्षीय मुलीने आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लोखंडी सळईने वार केले. त्यानंतर एका धारदार वस्तूने तिच्यावर सुमारे 15 ते 20 वेळा वार केले. यात या मुलीचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जयपूर शहरात खळबळ उडाली.

हेही वाचा - Hyderabad Rape And Murder Case: नातेवाईकांनी 100 नंबरवर फोन लावता पोलीस म्हणाले 'पहिले आधार कार्ड क्रमांक सांगा'

अल्पवयीन मुलीने आठवीतील विद्यार्थींनीची हत्या केल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने मृतदेह एका गोणीत भरला आणि जवळच्या एका तलावात फेकला. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आई-वडिलांना अटक केली आहे.