Stampede at Surat Railway Station: गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत 1 ठार, अनेक जखमी
Stampede at Surat Railway Station (PC - Twitter)

Stampede at Surat Railway Station: गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर (Surat Railway Station) चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. दिवाळी निमित्त रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होत आहे. लोक ट्रेनने (Local Train) आपापल्या घरी जात होते. याच दरम्यान बिहारला जाणारी ट्रेन स्टेशनवर आली आणि त्यात चढताना प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यावेळी तीन ते चार जण बेशुद्ध झाले. सुरत रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिकेद्वारे जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुरतच्या खासदार आणि केंद्र सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या. पोलिस अधीक्षक (पश्चिम रेल्वे) सरजो कुमारी यांनी सांगितले की, सकाळी सुरत रेल्वे स्थानकावरून ताप्ती गंगा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. त्यामुळे गोंधळ झाला आणि काही लोक बेहोश झाले. (हेही वाचा - Delhi Accident video: वाहन चालवताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका, अनियंत्रित बसचा भीषण अपघात, घटना CCTV कैद)

त्यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होती. ज्यामुळे काही प्रवाशांना अस्वस्थता आणि चक्कर आली. प्रवाशांपैकी एकाला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. एसएमआयएमईआर रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी जयेश पटेल म्हणाले, 'गर्दीमुळे एक व्यक्ती कोसळला. त्याला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल. अन्य दोन प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरतमधील हिरे आणि कापड उद्योगात गुंतलेले अनेक कामगार छठपूजेसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी जात आहेत.'

नवसारी येथे पत्रकारांशी बोलताना गृह राज्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, बिहारकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची संख्या अचानक वाढल्यानंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पश्चिम रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, सणासुदीच्या काळात गर्दी लक्षात घेऊन विशेष उपाययोजना केल्या आहेत.