पद्मावत, राझी, न्यूडला मागे टाकून 'हा' आसामी चित्रपट निघाला ऑस्करला
(Photo credits: Twitter)

रीमा दास यांचा आसामी चित्रपट ‘व्हिलेज रॉकस्टार’ हा ऑस्करसाठीची भारताकडून ऑफिशिअल एंट्री असल्याची घोषणा  फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली आहे. शर्यतीत असणाऱ्या पद्मावत, राझी, पिहू, कडवी हवा आणि न्यूड अशा 28 चित्रपटांमधून ‘व्हिलेज रॉकस्टार’ची निवड झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला ‘व्हिलेज रॉकस्टार’ चित्रपट 'सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट' या श्रेणीत भारताचे प्रतिनिधीत्व करेल.

‘व्हिलेज रॉकस्टार’ या चित्रपटाने 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बाजी मारली होती. बेस्ट फिचर फिल्मचा मानकरी ठरलेल्या या चित्रपटाला बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट, बेस्ट साऊंड आणि बेस्ट एडिटींगचेही पुरस्कार मिळाले होते. तब्बल 29 वर्षांनंतर एखाद्या आसामी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली होती.

यातील बालकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या भनिता दासला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. 70 पेक्षा जास्त आतंरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला असून, हा चित्रपट चार राष्ट्रीय पुरस्कारासह 44 अन्य पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

'व्हिलेज रॉकस्टार्स' चित्रपटात एका 10 वर्षीय मुलीची धुनूची कथा दाखवण्यात आली आहे. या मुलीला गिटारिस्ट व्हायचे असते. संगीत क्षेत्रात आपले नाव कमवायचे असते ही या चित्रपटाची स्टोरी लाईन आहे. मागीलवर्षी राजकुमार राव याने अभिनय केलेल्या‘न्यूटन’ चित्रपटाला भारतातर्फे पाठवण्यात आले होते.

‘व्हिलेज रॉकस्टार’ हा चित्रपट 28 सप्टेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे.