नऊवारी साडी, नथ यांपासून ते एका योध्यापर्यंत, पहा Manikarnika मधील कंगणाचे विविध लूक्स
कंगना राणावत (संग्रहित-संपादित प्रतिमा)

क्वीन, तनु वेडस मनू 1 आणि 2, सिमरन अशा चित्रपटांमुळे रातोरात स्टार झालेल्या कंगना राणावत (Kangana Ranaut)चा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट येऊ घातला आहे. हा चित्रपट कंगनाच्या जीवनातील सर्वात महत्वाचा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. तो म्हणजे मणिकर्णिका (Manikarnika) ! झांशीच्या राणीच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर, त्यानंतर टीजर, ट्रेलर आणि आता नुकतेच प्रदर्शित झालेले ‘विजयी भव’ गाणे पाहून काहीतरी भव्य दिव्य पाहायला मिळेल यात काही शंका वाटत नाही. चित्रपटाचे सेट्स, लोकेशन्स, लाईट्स, दिग्दर्शन हे सर्व पाहून क्रिश (Krish) आणि कंगना यांनी 18 व्या शतकालीत काळ उभा करण्यात कोणतीही कसर ठेवली नसल्याचे जाणवते. या सर्वांत भाव खाऊन जाते ती झाशीच्या राणीच्या रूपातली कंगना. तिचे या चित्रपटातील कपडे, दागिने, मेकअप, हेअर  अशा एकंदरीत लूकचीच सर्वत्र चर्चा आहे.

पारंपारिक अंदाज, मराठमोळी साडी, त्याच पद्धतीचे कपडे, पतीनिधनानंतरचा एका योद्ध्याचा लूक अशा सर्वांवर मेहनत घेतली आहे ती प्रसिद्ध ड्रेस डिझाईनर नीता लुल्ला (Neeta Lulla) यांनी. नीता यांनी कंगनाच्या एकूण लूकची चार विभागात विभागणी केली. राणी लक्ष्मीबाई यांच्या स्वभावानुसार कपडे, त्यांचा पोत, रंग, दागिने अशा सर्व गोष्टी ठरवण्यात आल्या.

कंगनाचा लग्नाच्या आधीचा लूक अगदी साधा ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये आकाशी, पांढरा, फेंट पिवळा अशा पेस्टल रंगांचा वापर करण्यात आला आहे. यावेळचे तिचे दागिनेही अगदी कमी आणि साधे दिसून येतात. लग्नाच्यावेळी कंगनाचा लूक थोडा भडक होते. यावेळी लाल आणि केशरी यांसारखे रंग वापरण्यात आले आहेत. पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया साडीवर शाल घ्यायच्या, यातही कंगनाने असाच शेला वापरला आहे. खास महाराष्ट्रीयन स्त्रीला डोळ्यासमोर ठेऊन या साड्या तयार करण्यात आल्या आहेत. भरजरी पदर, मोठे काठ, काठावर नक्षीदार वेलबुट्टी हे यांचे वैशिष्ठ्य होय. यावेळचे कंगणाचे दागिने हे अगदी डोळ्यांचे पारणे फेडतील असे आहेत.

पती वियोगानंतर हेच रंग थोडे थंड पडतात. यावेळी नीता यांनी खाडी कपड्यांचा वापर केला आहे. शेवटी जेव्हा ती एक योद्धा म्हणून लढायला उभी ठाकते त्यावेळी काळा, भडक निळा, भडक हिरवा, भडक लाल अशा भडक रंगांचा वापर करण्यात आला आहे. (हेही वाचा : ‘मणिकर्णिका’ सिनेमासाठी कंगना रानौतने घेतले ‘इतके’ मानधन)

या सर्वांत डोळ्यात भरतो तो कंगनाचा नऊवारी साडीमधील लूक. 10 किलोपेक्षा जास्त वजनाची साडी कंगनाने यावेळी परिधान केली आहे. यात कंगणाचे दागिनेही फार महत्वाची भूमिका बजावतात. अगदी नथीपासून ते पोहेहार, मोतीहार पर्यंत टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने कंगनाने वापरले आहेत.  या सर्व राजेशाही दागिन्यांचे वजन हे सुमारे 20 किलो पर्यंत होते. यातील बरेच दागिने नीता लुल्ला यांनी स्वतः डिझाईन केले आहेत.