'बिग बॉस 18'ची (Bigg Boss 18) धमाकेदार सुरुवात झाली आहे. विवियन डिसेना, ॲलिस कौशिक, करणवीर मेहरा यांच्यासह 18 स्पर्धक या शोचा भाग बनले आहेत. पण यासोबतच, रविवारी झालेल्या ग्रँड प्रीमियर एपिसोडमध्ये '19वा स्पर्धक' म्हणून 'गधराज'न नावाच्या गाढवाने प्रवेश केला आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून खरा प्राणी ठेवण्यात आला आहे. पण त्यामुळे सलमान खानचा शो अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे. मेकर्सच्या या निर्णयाबाबत, प्राण्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा) इंडियाने नाराजी व्यक्त केली आहे.
पेटाने सलमान खान आणि बिग बॉसच्या निर्मात्यांना मनोरंजनाच्या उद्देशाने कोणत्याही प्राण्याचा समावेश न करण्याची विनंती केली आहे. सध्या गधराज नावाचा गाढव 'बिग बॉस 18' चा भाग आहे. त्याला उद्यान परिसरात जागा देण्यात आली असून, कुटुंबीयांना त्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता पेटा इंडियाच्या टीमने बुधवारी याबाबत मेकर्सला पत्र पाठवले आहे.
पाठवलेल्या पत्रानुसार, त्यांच्याकडे घरात राहणाऱ्या गाढवाबद्दल नाराजी व्यक्त करत लोकांच्या तक्रारी आहेत. पत्रात त्यांनी सलमान खान आणि निर्मात्यांनी प्राण्यांचा मनोरंजनाचे साधन म्हणून वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. पत्रात लिहिले आहे की, 'आम्हाला अनेक लोकांच्या तक्रारी आल्या आहेत, ज्यात त्यांनी गधराजला शोमधून काढून टाकण्याची विनंती केली आहे. लोकांचे म्हणणे आहे की, शोद्वारे मनोरंजक करण्यासाठी कोणत्याही प्राण्याचा वापर करणे योग्य नाही. यामुळे अनेक समस्या निर्माण होती. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना गधराज (गाढव) पेटा इंडियाकडे सोपवण्यास सांगा.’ (हेही वाचा: Guru Aniruddhacharya Gifts Bhagavad Gita To Salman Khan: अध्यात्मिक गुरू अनिरुद्धाचार्य यांनी सलमान खानला दिली भगवत गीता; सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो)
पेटा इंडियाने जारी केलेल्या पत्रात असेही लिहिले आहे की, 'गाढव हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला त्याच्या कळपात राहण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे.’ या पत्रात, शोच्या सेटवर प्राण्यांचा वापर करणे ही काही हसण्यासारखी गोष्ट नाही, यावर जोर देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी हे गाढव दुधावर संशोधनासाठी ठेवले आहे. मात्र पेटा इंडियाच्या टीमने स्पष्टीकरण दिले आहे की, गाढव फक्त त्यांच्या मुलांनाच दूध देतात.