लोकप्रिय शो Sarabhai vs Sarabhai चा पाकिस्तानमध्ये बनला रिमेक; व्हिडिओ पाहून भडकला मूळ लेखक आतिश कपाड़िया, व्यक्त केला संताप
Ratna Pathak Shah and Rupali Ganguly in Sarabhai V/S Sarabhai (Photo Credits: Still Image)

90 च्या दशकातील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ (Sarabhai vs Sarabhai) बंद होऊन बराच काळ लोटला आहे, परंतु अजूनही या शोच्या आठवणी ताज्या आहेत. टीव्ही इंडस्ट्रीमधील हा असा एक कार्यक्रम होता ज्याने टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या सास-बहू मालिकांच्या कचाट्यामधून प्रेक्षकांना मुक्त केले. हा कॉमेडी शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता व अजूनही त्याचा फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. तर आता इतक्या वर्षांनी हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोचे लेखक आतिश कपाडिया (Aatish Kapadia) यांनी नुकतेच आपल्या फेसबुकद्वारे सांगितले आहे की, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’चा 'अनधिकृत रीमेक' पाकिस्तानमध्ये बनविला गेला आहे.

या रिमेकचा एक व्हिडिओ पाहून आतिश आतिशय भडकले असून, त्यांनी सोशल मिडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. आतिश कपाडिया यांनी लिहिले आहे, 'सकाळी एक फॉरवर्ड व्हिडिओ लिंक मिळाली जी तपासली असता मला दिसले की आमच्या 'साराभाई व्हर्सेस साराभाई' शोचा एक अनधिकृत रीमेक बनविला गेला आहे. महत्वाचे म्हणजे परवानगी न घेता अगदी शब्दशः आणि फ्रेम टू फ्रेम तो कॉपी केला आहे. इतकेच नाही तर निर्लज्जपणे तो रिमेक विनामूल्य व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून दिला आहे.’

पुढे ते लिहितात, ’एखाद्या शोपासून प्रेरणा घेऊन त्यावरून आपला स्वतःचा शो तयार करणे हे मी समजू शकतो. आमच्या 'खिचडी' सारख्या शोने बर्‍याच निर्मात्यांना त्याच धर्तीवर 'खिचडी' ची आवृत्ती तयार करण्यास प्रेरित केले. परंतु समस्या अशी होती की ते तो शो बनवण्यामागील तर्कशास्त्र समजत नव्हते. त्याचप्रमाणे ही साराभाईंमुळे प्रेरित झालेली आवृत्तीही चुकीची आहे. त्यांना वाटले की हा कार्यक्रम केवळ दोन वर्गांमधील संघर्ष आहे, मात्र खरे तर तो त्यातील फक्त एक पैलू होता. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' चा हा रिमेक खूपच भयावह आहे. माझ्या मित्रांना विनंती आहे की योगायोगाने जर त्यांची नजर या उघड उघड केलेल्या चोरीवर पडली तर कृपया त्यांना व्ह्यूज मिळवून देऊ नका. म्हणजेच हा शो पाहू नका.’ (हेही वाचा: अंकिता लोखंडे हिने First Kiss गाण्यावर बनवला व्हिडिओ, सुशांत राजपूत च्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप)

दरम्यान, 'साराभाई व्हर्सेस साराभाई' ला जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी एकत्रितपणे बनवले होते. शोचे दिग्दर्शन देवेन भोजानीने केले होते. या शोमध्ये सतीश शाह, रत्ना पाठक, रुपाली गांगुली, सुमित राघवन आणि राजेश कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. शोचा पहिला सीझन जबरदस्त हिट झाला होता.