Heropanti 2 Posters: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
Heropanti 2 Posters (Photo Credits: Twitter)

Heropanti 2 Posters: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) आगामी चित्रपट 'हिरोपंती 2' चे पोस्टर (Heropanti 2 Posters) नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफचा अॅक्शन लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान (Ahmed Khan) करणार असून साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

'हिरोपंती 2' हा चित्रपट 16 जुलै 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. टायगर श्रॉफने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 2014 मध्ये टायगर श्रॉफने 'हिरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा या चित्रपटाचे दिग्दर्शन साबीर खान यांनी केले होते. या चित्रपटातील अॅक्शन सीनमुळे टायगर श्रॉफ चर्चेत आला होता. आता याच चित्रपटाचा सीक्वल 'हिरोपंती 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, नेटकऱ्यांनी 'हिरोपंती 2' च्या पोस्टरवरून टायगरवर हॉलिवूड चित्रपट ‘जॉन विक’ची कॉपी केल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा - अभिनेत्री मल्लिका शेरावतने शेअर केला टॉपलेस फोटो; पहा बोल्ड अंदाज)

या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ अॅक्शन लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरमधील टायगर श्रॉफने परिधान केलेले कपडे, त्याची उभं राहण्याची स्टाइल या सर्व गोष्टी ‘जॉन विक’ या हॉलिवूडपटातील चित्रपटाप्रमाणे आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची टॅगलाइनही ‘द वर्ल्ड वॉन्ट्स हिम डेड’ अशी आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘जॉन विक’ची कॉपी असणार आहे, हे प्रेक्षकांना आताचं समजलं आहे. त्यामुळे प्रेक्षक टायगरच्या या आगामी चित्रपटासाठी किती उत्सुक असतील? याबाबात शंका व्यक्त केली जात आहे.

'हिरोपंती 2' चित्रपटात टायगरची मुख्य भूमिका असणार आहे. तसेच टायरसोबत या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार हे अद्याप ठरलेलं नाही. या चित्रपटाच्या पहिल्या भागात कृति सेनॉनने मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती. सध्या टायगर श्रॉफ ‘बागी 3’ चित्रपटाच्या प्रचारामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगरचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. बागी 2 चित्रपटात टायगरसोबत श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.