प्रदर्शनापूर्वी 'भाई' चित्रपटाच्या वाट्यात अडथळा; सिंगल स्क्रीन मालकांनी चित्रपट दाखवण्यास दिला नकार
भाई – व्यक्ती की वल्ली (Photo credit : youtube)

महाराष्ट्राचे लाडके दैवत पु.ल.देशपांडे, यांचा जीवनपट उलगडणारा बहुप्रतीक्षित 'भाई – व्यक्ती की वल्ली' हा चित्रपट 4 जानेवारी, म्हणजेच उद्या सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मात्र नेहमीप्रमाणेच प्रदर्शनावेळी उद्भवणारा अडथळा या चित्रपटाच्याही वाट्याला आला आहे, आणि तोही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि चित्रपटसृष्टीची पंढरी मुंबई येथे. पुणे - मुंबई येथील सिंगल स्क्रिन मालकांनी हा चित्रपट दाखवण्यास नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. यामागे कारण आहे, मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला रोहित शेट्टीचा हिंदी चित्रपट सिंबा.

मराठी प्रेक्षक ‘भाई’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र या चित्रपटाची चर्चा होताना दिसून येत आहे. मात्र आता चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना या चित्रपटाला थिएटर मिळेनासे झाले आहे. ‘सिंबा’च्या वितरकांचा दबाव चित्रपटगृहांच्या मालकांवर येत आहे, त्यामुळे अनेकांनी ‘भाई’ चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे. इच्छा असूनही चित्रपटगृहाचे मालक हा चित्रपट दाखवू शकत नाहीत. या मुद्द्यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपले मत व्यक्त केले, ते म्हणाले ‘सरकारने कायदा करूनही दर शुक्रवारी मराठी चित्रपटाला झगडावे लागणे योग्य नाही. रोहित शेट्टीचा सिंबा चालतोय, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी मराठी चित्रपटांवर अन्याय होणे बरोबर नाही.’ (हेही वाचा : मोठ्या पडद्यावरचे युद्ध; पहा जानेवारी 2019 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची यादी)

मागच्या आठवड्यात ‘सिंबा’ प्रदर्शित झाला. बघता बघता या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे. या चित्रपट देशभरात तब्बल 4000 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 124 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा बिझनेस केला आहे. हे चित्र असताना चित्रपटगृहांचे मालक ‘भाई’ला स्क्रीन्स देण्यास तयार नाहीत. भाई या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून, पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत. सागर देशमुख या उमद्या कलाकाराने पुलंची भूमिका साकारली आहे. यावर आता चित्रपटाचे निर्माते काय भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.