2018 मध्ये पद्मावतपासून सुरु झालेले चक्र सिंबापर्यंत येऊन थांबले. अनेक वाद, लो बजेट चित्रपटांचे यश, 100 करोडचा टप्पा पार करणारे अनेक चित्रपट, नव्याने उदयास आलेले कलाकार, स्टार किड्सची एंट्री या सर्वांनी चित्रपटसृष्टीमधील 2018 हे वर्ष गाजले. आता 2019 मध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट पाहता यावर्षीही प्रेक्षकांना अशीच ट्रिट मिळेल यात काही शंका नाही. याची सुरुवात जानेवारीपासूनच होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या मुहूर्तावर अनेक मोठ्या चित्रपटांचे युद्ध पाहायला मिळेत. यात मराठी चित्रपटसृष्टीही मागे नाही. ‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ने झालेला 2018 चा गोड शेवट, तर 2019 ची सुरुवात ‘भाई’ या चित्रपटाने होणार आहे. चला तर पाहूया जानेवारी 2019 मध्ये कोणते मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
> 4 जानेवारी
हा दिवस मराठी चित्रपटांसाठी एका चांगल्या मुहुर्तासारखा ठरणार आहे. या दिवशी तब्बल 4 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
'भाई - व्यक्ती की वल्ली' – महेश मांजरेकर निर्मित भाई या चित्रपटामधून पु.ल.देशपांडे यांचा जीवनपट उलगडणार आहे. टीजर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. सागर देशमुख हा अभिनेता पुलंची भूमिका साकारत आहे.
जिवाशिवा – प्रशांत नखाते निर्मित, शिवरायांच्या शिकवणीवर भाष्य करणारा जिवाशिवा हा चित्रपट 4 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
ये रे ये रे पैसा 2 - उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव आणि संजय नार्वेकर अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट आहे. हेमंड ढोमे या अभिनेत्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
सोहळा - आशयघन चित्रपटांची निर्मिती करणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा सोहळा हा चित्रपट 4 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये नात्यांमधील होणाऱ्या बदलावर भाष्य करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सचिन पिळगांवकर आणि गजेंद्र अहिरे एकत्र येत आहेत.
> 11 जानेवारी
नशीबवान - भाऊ कदम यांचा बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. 'नशीबवान' या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण अमोल वसंत गोळे यांनी केले आहे.
लव्ह यु जिंदगी - सचिन पिळगांवकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला, ‘आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, असा संदेश देणारा ‘लव्ह यु जिंदगी’ हा मराठी चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
फाईट - महाराष्ट्राच्या मातीतले कथानक आणि थरारक अॅक्शन असलेला फाईट 11 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, पूर्वा शिंदे, कमल ठोके यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
बॅलन्स – हरीश थोरात आणि रिची जैन यांच्या प्रमुख भूमिका असलेला बॅलन्स हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. स्वरूप सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
> 25 जानेवारी
ठाकरे - बाळासाहेब यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. ठाकरे हा चित्रपट मराठी आणि हिंदीत प्रदर्शित होणार आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी याने बाळासाहेबांची भूमिका पार पाडली आहे.