नाना पाटेकरांनंतर एका प्रथितयश दिग्दर्शकावरही तनुश्री दत्ताचे आरोप
तनुश्री दत्ता (Photo Credits : Instagram)

#MeToo या कँँम्पेनच्या माध्यमातून हॉलीवूड तसेच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी स्वतःवर झालेल्या लैगिक अत्याचाराविषयी वाचा फोडली. याच कॅम्पेनचा एक भाग म्हणून नुकतेच अभिनेत्री तनुश्री दत्ताहिने सुद्धा काही वर्षांपूर्वी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची जगाला कल्पना दिली. तनुश्रीने इंडस्ट्रीमध्ये 4 प्रतिष्ठीत लोकांवर आरोप केले होते, त्यातील एक महत्वाचे नाव होते नाना पाटेकर यांचे. नाना पाटेकर यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता असे तनुश्री दत्ताने एका मुलाखतीमध्ये सांगितले. तनुश्रीने नानांचे नाव घेतल्यानंतर संपूर्ण इंडस्ट्री हादरून गेली होती. एका जेष्ठ कलाकाराकडून असा प्रमाद घडलेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

याबाबत नुकतेच गणेश आचार्यने तनुश्रीने केलेले आरोप हे खोटे असल्याचे सांगितले होते, मात्र परत गणेश, नाना पाटेकर यांचे कृत्य झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे तनुश्रीने सांगितले. याबाबत बरेच तर्क वितर्क, चर्चा झाल्यानंतर शेवटी नाना पाटेकर यांनी आपले मौन सोडले आहे. तनुश्रीने केलेले सारे आरोप नाना पाटेकर यांनी फेटाळून लावले आहेत. ‘सेटवर शेकडो लोक उपस्थित होते मग सर्वांसमोर मी तिच्याशी गैरवर्तणूक केली असे ती का म्हणत आहे? कोणी काय बोलायचे हे आपण कसे ठरवणार, कोणी काहीही म्हटले तरी मला जे आयुष्यात करायचे आहे मी तेच करणार, अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी दिली आहे. तसेच तनुश्रीला नोटीस पाठवून तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई देखील करणार असल्याचे नानांनी सांगितले.

या घटनेनंतर इंडस्ट्रीमधून चहूबाजूंनी कलाकारांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. अनेक कलाकारांनी तनुश्रीला समर्थन देऊन तिला पाठींबा दर्शवला आहे. स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, फरहान अख्तर, ट्विंकल खन्ना, प्रियंका चोप्रा अशा अनेकांनी ट्विटद्वारे घडलेल्या प्रकाराबद्दल आपला राग व्यक्त केला आहे.

 

याच दरम्यान एका महिला पत्रकाराने त्यावेळी आपण सेटवर उपस्थित असल्याचे सांगत तनुश्रीचा शब्द आणि शब्द खरा असल्याचे म्हटले आहे.

हे वादळ ताजे असतानाच तनुश्रीने अजून एका दिग्दर्शकावरही लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. विवेक अग्निहोत्री असे या दिग्दर्शकाचे नाव असून, चॉकलेट, धन धना धन, हेट स्टोरी अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. 'विवेकने मला माझे कपडे काढून इरफान खान आणि सुनील शेट्टी यांच्यासमोर डान्स करण्यास सांगितले होते', असे तनुश्रीने म्हटले आहे. त्यांनतर इरफान आणि सुनील यांनी विवेकला त्याबद्दल हटकले होते. असेही तनुश्री म्हणाली.

नक्की काय घडले होते –

2008 साली तनुश्री दत्ताला ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटामध्ये कास्ट करण्यात आले होते. त्यावेळी सुरुवातीपासूनच नानांचे वागणे तनुश्रीसोबत ठीक नव्हते. चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी तनुश्रीशी अनेक वेळा असभ्य वर्तन केले. नानांनी तनुश्रीच्या हाताला पकडणे, तिला खेचणे असे प्रकार सुरु केले होते. याबाबत तनुश्रीने निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोघांकडेही तक्रार केली होती मात्र, दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर नानांनी एका गाण्यामध्ये तनुश्रीसोबत इंटीमेट सीन करण्याची मागणी केली. करारानुसार ते गाणे फक्त तनुश्रीवर चित्रित करण्यात येणार होते. मात्र तरीही नाना पाटेकर यांना त्या गाण्यामध्ये तनुश्रीसोबत डान्स करायचा होता. यानंतर जेव्हा तनुश्रीने याबाबत आपला आवाज उठवला तेव्हा नाना पाटेकर यांनी सेटवर मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. ज्यांनी सेटवर बराच धिंगाणा घातला आणि तनुश्रीच्या गाडीची तोडफोड केली. शेवटी बंदुकधारी पोलिसांच्या मदतीने ही तोडफोड थांबवण्यात आली. 2008 साली चित्रपटाच्या शुटींगदरम्यान ही घटना घडली होती असे तनुश्रीने सांगितले. त्यांनतर तनुश्रीऐवजी राखी सावंतला घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्यात आला.