राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री' दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाला सामिक्षकांसोबतच प्रेक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ९१.७७ करोड रुपयांपर्यंत पोहचले आहे. सध्याचे या चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे पाहता लवकरच हा चित्रपट १०० करोडच्या यादीत पोहचेल यात काहीच शंका नाही. भारतीय ‘स्त्री’ची हॉलीवूडच्या ‘द नन’शी तगडी टक्कर होती, मात्र आता स्त्रीने द ननलाही मागे टाकून बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
राजकुमार रावच्या या हॉरर कॉमेडी सिनेमाने आपल्या ओपनिंग डेच्या दिवशी शुक्रवारी ६.८३ करोड रुपये कलेक्शव केलं होते, तर पहिल्या आठवड्यात ६०.३९ करोड रुपयांची कमाई केली आहे.
राजकुमार रावची ही सर्वात जास्त कमाई फिल्म ठरली आहे, तर श्रद्धा कपूरची तिसरी सर्वात जास्त कमाई करणारी फिल्म ठरली आहे. तसेच २०१८ सालामध्ये आत्तापर्यंतच्या चित्रपटांपैकी या चित्रपटाने सर्वात कमाई केली आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण इतकी कमाई करणारा हा चित्रपट अतिशय लो बजेट असून फक्त ४० दिवसांमध्ये बनला आहे. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. सध्याची चित्रपटाची घोडदौड पाहता चित्रपट अजून किती गल्ला जमवण्यात यशस्वी होतो हे पाहणे महत्वाचे आहे.