सलमान खानच्या 'या' चित्रपटामधून शिल्पा शिंदे करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण
शिल्पा शिंदे (Photo Credit: Instagram)

बिग बॉस 11मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली शिल्पा शिंदे आता करिअरची दुसरी इनिंग खेळण्यास सज्ज झाली आहे. 'भाभीजी घर पर है' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या शिल्पाने हीना खानला मात देऊन बिग बॉस11च्या ट्रॉफीवर आपेल नाव कोरले होते. यानंतर ती पुढचा कोणता प्रोजेक्ट स्वीकारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. बिग बॉस नंतर शिल्पाला अनेक ऑफर्स मिळाल्या, मात्र तिने त्या साफ धुडकावून लावल्या. मात्र आता मिळालेल्या बातमीनुसार शिल्पा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे, आणि तेही सलमान खानच्या चित्रपटामधून.

मागच्या वर्षी ऋषि कपूरची फिल्म ‘पटेल की पंजाबी शादी’मध्ये शिल्पा शिंदेने एक आयटम सॉंग केले होते. मात्र आता शिल्पा इलुया वंतूरचा चित्रपट ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’द्वारे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकणार आहे. इलुया वंतूर ही सलमान खानची मैत्रीण असून सलमान आणि इलुया या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटामधील दुसऱ्या मुख्य भूमिकेसाठी शिल्पाची निवड झाल्याचे सांगितले जात आहे. येत्या 12 नोव्हेंबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रेम सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे. एक विदेशी मुलगी भारतात येऊन कृष्णभक्तीमध्ये लीन होते, त्यानंतर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. आता शिल्पा यात नेमके कोणते पात्र साकारणार हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.