अनुप जलोटा आणि जसलीन मथारू या जोडीने बिग बॉसच्या घरात पाय ठेवताच हंगामा करायला सुरुवात केली. वयातील अंतरामुळे यांच्या नात्याचे हसू झाले, मात्र तरीही हे दोघे एकमेकांवरील आपले प्रेम नेहमीच सिद्ध करत आले. त्यामुळे अल्पावधीत ही जोडी फारच लोकप्रिय झाली. नुकतेच एका टास्क दरम्यान जसलीनच्या वागण्याने दुःखी झालेल्या अनुप जालोटांनी जसलीनसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या दोघांमधील प्रेमच यांना एकत्र बांधून ठेवेल यात शंका नाही. आता ही जोडी इतकी अनोखी ठरत आहे, की अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या नात्यावर बॉलिवूडमध्ये एक सिनेमा येऊ घातला आहे. आणि आश्चर्य म्हणजे यात शक्ती कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
‘जर्नी ऑफ कर्मा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात हॉट अॅण्ड बोल्ड अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे शक्ती कपूर यांची हिरोईन आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज प्रदर्शित झाला आहे. यात 65 वर्षांचे शक्ती कपूर, पूनम पांडेसोबत अतिशय बोल्ड रूपात रोमान्स करताना दिसत आहेत. एका मुलाखतीदरम्यान शक्ती कपूर यांनी खुलासा केला की, ‘माझा येणारा नवीन चित्रपट हा अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या प्रेमकहानीशी मिळताजुळता आहे. माझे दोन चित्रपट अनुप यांनीस केले आहेत. मात्र आता येणारा हा चित्रपट त्यांच्या प्रेमकहाणीशी संबंधित असेल. प्रेमाला वयाचे बंधन नसते, त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही’.
शक्ती कपूर यांनी अनके चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत. आता बऱ्याच कालावधीनंतर शक्ती कपूर यांचा रोमान्स पडद्यावर पाहण्याची संधी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना मिळणार आहे. 26 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.