चित्रपटसृष्टीसाठी नवर्षातील जानेवारी महिना हा अतिशय भाग्यशाली असल्याचे दिसून येत आहे. आता सर्वत्र चर्चा आहे ती 'ठाकरे' (Thackeray) चित्रपटाची. बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांच्या आयुष्यावर आधारीत महत्वकांक्षी चित्रपट 'ठाकरे' येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. आज या चित्रपटाचे संगीत प्रदर्शित झाले. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर लोकांच्या मनात चित्रपटाबद्दलची उत्सुकता तर अजूनच वाढली. मात्र यामध्ये एकच गोष्ट खटकली ती, मराठी चित्रपटासाठी वापरण्यात आलेला बाळासाहेबांचा आवाज. हा आवाज मराठी लोकांना अजिबात भावला नाही, त्यामुळे हा आवाज बदलण्याची मागणी केली जात होती. आता शेवटी संजय राऊत यांनी हा आवाज बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. मराठी व्हर्जनसाठी नवाजुद्दीनने मराठी शिकण्याचा प्रयत्न केला, मात्र ते समीकरण काही जुळून आले नाही. म्हणून त्यासाठी सचिन खेडेकर यांनी आपला आवाज दिला. मात्र या आवाजामुळे मराठी लोकांची घोर निराशा केली. हा आवाज बाळासाहेबांशी अजिबात मिळताजुळता नसल्याने हा आवाज बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा आवाज तसाच ठेवण्यात येईल असे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र आता त्यांनी हा आवाज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चेतन शशीतल यांचेही नाव पुढे आले. आता सध्या तीन आवाजांच्या चाचण्या सुरु आहेत. यापैकी एक आवाज आम्ही ठाकरे सिनेमासाठी निवडणार आहोत असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान ठाकरे सिनेमातील ‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’ हे गाणे आज लाँच करण्यात आले. अल्पावधीत या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा बाळासाहेबांची भूमिका सकारात आहे तर, मीनाताई ठाकरेंची भूमिका अभिनेत्री अमृता राव सकारात आहे.