Saavat Official Teaser: सात श्रावणातील सात खून आणि गडद होत जाणारे भीतीचे 'सावट', 22 मार्चला उलगडणार रहस्य
सावट चित्रपट (Photo Credit : Youtube)

Saavat Teaser: भारतात असलेला अंधश्रद्धेचा, जादू टोण्याचा किंवा काळ्या विद्येचा पगडा आजही आहे. समाजाचा भाग असलेल्या या गोष्टींचे प्रतिबिंब आपण नेहमीच चित्रपटांमध्ये पाहत असतो. हिंदी भाषेत अनेक उत्तम भयपट बनले आहेत, मात्र मराठीमध्ये अजूनही असे विषय रुजत आहेत. अशातच ‘सावट’ (Saavat) नावाचा एक थरारक भयपट येऊ घातला आहे. मराठी सस्पेंस थ्रिलर असलेल्या या चित्रपटाचा नुकताच दुसरा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीजरमधून चित्रपटाची कथा काय असावी याचा अंदाज येतो. चित्रपटाच्या बॅकग्राउंड स्कोअरमुळे तर हे भीतीचे सावट अजून गडद होत जाते. सौरभ सिंहा (Saurabh Sinha)  दिग्दर्शित ‘सावट’ येत्या 22 मार्चला प्रदर्शित होत आहे.

चित्रपटाची कथा एका गावामध्ये घडते, जिथे 7 वर्षांमध्ये श्रावण महिन्यात 7 आत्महत्या होतात. मात्र यामागील कारण कोणालाच माहित नसते. भगत, बुवा, साधू, होम, हवन, महापूजा सर्व काही केले जाते तरी गावातील हे भीतीचे सावट काही नाहीसे होत नाही. शेवटी गावात एक पोलीस अधिकारी येते, मात्र गावात घडत असलेल्या अंधश्रध्देच्याही पलीकडच्या या गोष्टी ती समजू शकेल? चेटकीण, हडळ, जखिण यांसारख्या गोष्टींवर विज्ञान अथवा मानवाचे लॉजिक विजय प्राप्त करू शकेल? शेवटी या आत्महत्या थांबतात? अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी तुम्हाला हा भयपट पहावाच लागेल.

आपला समाज आपल्याला ब-याचदा रूढींची पडताळणी न करता त्या पाळायला भाग पाडतो. सावटची कथा श्रध्दा आणि अंधश्रध्देच्या किना-यावर असलेल्या या समजूतींवर भाष्य करते. या चित्रपटात स्मिता तांबे, मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे आणि संजीवनी जाधव यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.