एकेकाळी लाखो मुलींच्या हृदयाची धडकन असलेल्या अभिनेत्याला कॅन्सर; मात्र कुटुंबियांनी फेटाळले वृत्त
ऋषि कपूर आणि रणधीर कपूर (Photo Credits: Twitter)

ऋषी कपूर हे सध्या उपचारांसाठी परदेशी असल्याचे सर्वांनाच माहित आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवर त्या आशयाचे ट्विट केले होते. ‘मी उपचारासाठी अमेरिकेत जातोय. मी लवकर परत येईल. कृपया कुठलेही तर्क काढू नये’ या आशयाचे ते ट्विट होते. पत्नी नीतू कपूर आणि मुलगा रणबीर कपूर हे देखील त्यांच्यासोबत अमेरिकेत आहेत. म्हणूनच ते त्यांची आई कृष्णा कपूर यांच्या अंत्यविधीलादेखील येऊ शकले नाहीत. त्यानंतर याचे कारण शोधण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी अनेक प्रकारचे तर्क वितर्क लढवले. मात्र ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले होते.

आधी मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला आहे. हा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात पोहचला आहे. तथापि हा कुठला कॅन्सर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बॉलिवूडबबल या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले होते. कॅन्सरचे निदान झाल्यावर ताबडतोप ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाले. किमोथेरपी सेशनसोबतच इतर 45 दिवसांचे उपचार त्यांना सुचवले गेले असेही सांगण्यात आले होते. मात्र याबाबत जेव्हा कपूर कुटुंबातील इतर सदस्यांना विचारणा केली असता त्यांने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

रणधीर कपूर यांनी सांगितले की, 'अजून ऋषी कपूर यांच्या टेस्ट होणे बाकी आहे, त्यानंतरच गोष्टींचा उलगडा होईल. ऋषी कपूर यांना स्वतःलाच माहित नाही त्यांना काय झालय. पहिल्यांदा त्यांना टेस्ट पूर्ण करू देत, गोष्टीचे निदान होवूदे त्यांनतर सर्व गोष्टींची माहिती आम्ही लोकांना देवूच. मात्र त्याआधीच असे तर्क लढवणे योग्य नाही'. त्यामुळे आता टेस्ट झाल्यावर येणाऱ्या रिपोर्टनंतरच सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे.

सध्या ऋषी कपूर यांच्यासोबत असलेला रणबीर लवकरच आपल्या चित्रपटाच्या शूटींगसाठी भारतात परतणार आहे. त्यानंतर मुलगी रिद्धिमा कपूर अमेरिकेला रवाना होणार आहे. ऋषी कपूर यांच्या आजारपणामुळे तूर्तास जुही चावलासोबतच्या त्यांच्या एका चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.