राखी सावंत हे नाव कायमच मीडियामध्ये चर्चेत राहिलं आहे . तिच्या सेंसेशनल सोशल मीडिया पोस्ट्सपासून ते तिच्या वादग्रस्त विधानांनी, ती नेहमीच हेडलाईन्समध्ये असते. अलीकडेच तिने केलेल्या सीक्रेट विवाहामुळे ती चर्चेत होती. पण अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. कारण राखीने या आधीही दीपक कलाल सोबत लग्न करत असल्याचं खोटं नाटक मीडियासमोर केलं होतं.
यावेळी मात्र राखी खरंच लग्नबंधनात अडकली आहे असं दिसत आहे. रितेश नावाच्या एका एनआरआयशी लग्न केल्याचं तिनं तिच्या सोशल मीडिया द्वारे सांगितलं होतं. मात्र त्याचा चेहरा किंवा अजून कोणतीही ओळख राखीने करून दिली नव्हती.
रितेशने मात्र अलीकडेच स्पॉटबॉय-ई या वेबसाईटला एक मुलाखत दिली आहे. ही त्याची पहिलीच मुलाखत असून, त्याने राखी आणि त्याच्या विवाहाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. "राखीचे कॅमेऱ्यासमोर कसेही वागणे असले तरी ती मनाने खूप चांगली आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो आणि राखी म्हणजे मला देवानं दिलेली भेट आहे असं मानतो. मी आजवर तिच्यासारखी महिला कधीच पाहिली नाही," असं रितेश म्हणाला.
तो मीडियासमोर का येत नाही असं विचारताच तो म्हणाला, "मी मीडियासमोर का यावं? त्यातून मला काय साध्य होणार आहे? काहीतरी वादग्रस्तच लिहिलं जाईल. आणि मला माझं खासगी आयुष्य मीडियासमोर मांडायला आवडत नाही. इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याने मला काहीही फरक पडत नाही. कोणाला काय विचार करायचे ते करू देत. माझं आणि राखीचं कुटुंब आहे आणि आम्ही दोघंही खूप खूश आहोत. मी मीडियासमोर येईनही पण योग्य वेळ आली कीच. सध्या तरी मी असं काही करण्याच्या विचारात नाही."
राखीने सिनेमात बोल्ड सीन करावे की नाही, यावर रितेश म्हणाला, "राखी आणि मी नुकत्याच आमच्या विवाहित आयुष्याला सुरुवात केली आहे. आपल्या पत्नीने सिनेमात बोल्ड सीन करावेत असं कोणत्या पतीला वाटेल. तसं असलं तरी तिच्या कपडे घालण्यावर माझा आक्षेप नाही आणि ती तिच्या आवडीप्रमाणं कपडे घालू शकते.'