PM Narendra Modi Biopic First Look : नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित
नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत विवेक ओबेरॉय (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक येऊ घातला आहे. पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) असे या चित्रपटाचे नाव असून, विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या लूकमध्ये विवेक ओबेरॉय ओळखूही येत नाही. विवेकचा लूक तंतोतंत नरेंद्र मोदी यांच्याशी मिळताजुळता आहे. मोदी यांच्याप्रमाणे दाढी, केस आणि कुर्ता असा या पोस्टरमधील लूक आहे. विवेक ओबेरॉयने आपल्या ट्वीटरवर हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्याखाली, "जय हिंद. या अतुलनीय प्रवासासाठी आम्ही आपल्याकडून आशीर्वाद आणि प्रार्थनेची विनंती करतो" असे कॅप्शन दिले आहे.

उमंग कुमार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर, सुरेश ओबेरॉय आणि संदीप सिंग हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. भारतातील इतक्या मोठ्या व्यक्तीच्या जीवनावरील हा बायोपिक असल्याने, त्याची तयारीही गेली अडीच वर्षे चालू आहे. यासाठी गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा अनेक राज्यांमध्ये शुटींग करण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या टीमचे कथा, पटकथा आणि संवाद यांच्यावर काम चालू आहे. जानेवारीपासून या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

गेली अनेक वर्षे विवेक ओबेरॉय चित्रपटसृष्टीपासून दूर होता, मात्र आता पंतप्रधानांसारख्या एका महत्वाच्या व्यक्तीची भूमिका साकारत विवेक पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये दमदार एंट्री घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. हा चित्रपट तब्बल 23 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान प्रेक्षकांना हा फर्स्ट लूक अतिशय आवडला असून, लोक विवेक ओबेरॉय ते नरेंद्र मोदी या ट्रान्स्फॉर्मेशनचे कौतुक करीत आहेत.