‘भारत माझा देश आहे’ मध्ये झळकणार तुझ्यात जीव रंगला फेम लाडू

देशभक्तीच्या भावनेने भरलेला ‘भारत माझा देश आहे’ (Bharath Majha Desh Aahe) हा चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा एका गावातील आहे, जिथल्या प्रत्येक घरातील व्यक्ती सैनिकात आहे. टिव्हीवर झळकलेल्या एका ब्रेकिंग न्यूजनंतर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांची घालमेल, भीती यात पाहायला मिळणार आहे. यात मंगेश देसाई, हेमांगी कवी, शशांक शेंडे, छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे दोन चिमुकले चेहरे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या दोघांचाही हा पहिला चित्रपट असून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी व्यक्तिरेखा या चिमुरड्यांनी साकारली आहे. यापूर्वी राजविरसिंह राजे गायकवाड मालिकेतील ‘लाडू’ या व्यक्तिरेखेमुळे घराघरांत पोहोचला. ‘भारत माझा देश आहे’च्या माध्यमातून राजविरसिंह चित्रपटात पदार्पण करत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात," या चित्रपटात या दोन्ही बालकराकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या दोघांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक संदेश देण्याच्या प्रयत्न करत आहोत. हा चित्रपट प्रत्येक पाल्याने आपल्या पालकांसोबत आवर्जून पाहावा असा आहे. सामाजिक संदेश देण्याबरोबरच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा चित्रपट असून यात एका बकरीचीही प्रमुख भूमिका आहे. ती कशी हे चित्रपट पाहिल्यावर कळेलच.’’ (हे देखील वाचा:

एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाची कथा पांडुरंग जाधव यांनीच लिहिली असून या चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लाभले आहे तर अश्विन श्रीनिवास यांनी संगीत दिले आहे. तर निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद असून निलेश गावंड यांनी 'भारत माझा देश आहे'चे संकलन केले असून छायांकन नागराज यांनी केले आहे.