Tu ani me me ani tu (Photo Credit - Social Media)

'तू आणि मी, मी आणि तू' (Tu Ani Me, Me Ani Tu) या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या हस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या चित्रपटातून रुपालीताई यांचा मुलगा सोहम (Soham Chakankar) चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून सोहमच्या वाढदिवशी आई मुलाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरचे त्याच्या आईच्या म्हणजेच रुपालीताईंच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत याची जाणीव या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा ठाकरे (Shilpa Thackeray) आणि अभिनेता सोहम चाकणकर यांच्या फ्रेशजोडीने करून दिली.

शिल्पाने आजवर बऱ्याच मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या असून सोहम या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकत आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता शिल्पा आणि सोहमची लव्हेबल केमिस्ट्री कशी असेल याचा अंदाज येतोय. 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत निर्माते सागर जैन, ऋषभ कोठारी, राजू तोडसाम निर्मित आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित 'तू आणि मी, मी आणि तू' या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी लिखित आहे. तर चित्रपटाचे संगीताची बाजू संगीतकार प्रशांत सातोसे यांनी सांभाळली आहे, तसेच या चित्रपटाचा उत्तम असा कॅनव्हास व्यंकेट कुमार यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rupali Chakankar (@rupali_chakankar)

प्रेमाची आगळीवेगळी कथा घेऊन येत शिल्पा आणि सोहमची जोडी रसिक प्रेक्षकांवर राज्य करण्यास 'तू आणि मी, मी आणि तू' या चित्रपटातून सज्ज झाली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचली आहे, असे असताना लवकरच नव्या जोमाने हा चित्रपट सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला येत आहे. (हे देखील वाचा: Me Vasantrao Movie: 'मी वसंतराव'चं चित्रपटगृहात अर्धशतक; पन्नासाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ)

आजच्या या कार्यक्रमादरम्यान रुपालीताई चाकणकर असे म्हणाल्या की,"सर्वप्रथम सोहमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि टीम यांचे मनापासून आभार की माझ्या मुलाला या क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी त्यांनी दिली. राजकारणात मला कोणताही वारसा नसताना मी जशी या क्षेत्रात उतरले तसेच माझ्या मुलाने सोहमने चाकणकर कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसताना अभिनयक्षेत्रात स्वकर्तृत्वावर करिअर करण्याचा निर्णय घेतला. माझे बॅकग्राऊंड राजकीय असल्याने, शूटिंग दरम्यान सोहमने मला एक विनंती केली की, तू चुकूनही सेटवर येऊ नको कारण तू जर सेटवर आलीस तर संपूर्ण टीमला राजकीय दबावाच दडपण येईल आपण ही क्षेत्र वेगवेगळी ठेवू असे त्याने मला सांगितले."