एका छोटयाशा दुर्गम खेडेगावातल्या चिमुकल्यांनाही या पावसाची अशीच प्रतिक्षा आहे. त्यासाठी ते आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या आशा निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट म्हणजे ‘येरे येरे पावसा’ हा मराठी चित्रपट. आशावादाच्या सरी घेऊन या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी कलाकार तंत्रज्ञ, चित्रपटाचे वितरक अनिल थडानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या १७ जूनला चित्रपटगृहांत मनसोक्त भिजवायला हा पाऊस सज्ज झालाय. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. आपलं आणि पावसाचं नातं अगदी जवळचं असतं. हेच नातं अधोरेखित करताना पावसाची हलकी-फुलकी कथा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला असून ही गोष्ट प्रत्येकाला खूप काही देऊन जाईल, असा विश्वास दिग्दर्शक शफक खान यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
‘जीफोनी’, ‘हॉलीवूड नॉर्थ फिल्म’, ‘टोकियो इंडी फिल्म’ या आणि अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मोहोर उमटविणारा हा चित्रपट १७ जूनला तुमच्या भेटीला येतोय. १४ देशातल्या ३१ चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड झालेल्या या चित्रपटाने २२ नामांकन आणि १६ पुरस्कार आतापर्यंत पटकावले आहेत. (हे देखील वाचा: Ananya Teaser: अनन्याचा टीझर रिलीज, 23 जुलै रोजी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस)
छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, चिन्मयी साळवी, विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.