यावर्षीचा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) हा किताब काका पवार तालीम पुणे, येथील हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) या मल्लाने पटकाविला. त्यानंतर आज दिग्दर्शक सुजय डहाके (Sujay Dahake) याच्या 'केसरी' (Kesari) चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. काल या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे आनावरण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
'शाळा' फेम सुजय डहाके याचा केसरी हा नवा चित्रपट कुस्ती या विषयावर आधारीत आहे. महाराष्ट्राला कुस्तीची फार मोठी परंपरा लाभली आहे, मात्र आजपर्यंत कुस्ती या विषयावर आधारीत अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके चांगले चित्रपट आले आहेत. आता 'केसरी'च्या रूपाने सुजयने महाराष्ट्राच्या या पारंपारिक संस्कृतीला हात घातला आहे. विराट मडके (Virat Madake) या नव्या जोमाच्या उमद्या तरुणाने यात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
पहा टीजर -
कुस्तीची जिद्द बाळगलेल्या मात्र आर्थिक परिस्थितीने खंगलेल्या एका तरुणाची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खुराक नाही, चांगला वस्ताद नाही अशा परिस्थितीत अचानक या तरुणाच्या जीवनात एका वस्तादाची एन्ट्री होते आणि तिथून याचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. त्यानंतर मेहनत आणि कुस्तीचे डावपेच शिकत हा पैलवान कसा नावारूपास येतो हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रामुख्याने या ट्रेलरमध्ये एक पैलवान बनण्यासाठी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा सुजय एक वास्तववादी विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याची जाणींव होते.
विराटसह महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, उमेश जगताप, छाया कदम अशा महत्वाच्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. संतोष रामचंदानी आणि मनोहर रामचंदानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2014 साली सुजयच्या डोक्यात या चित्रपटाची कल्पना आली. त्यानंतर 2017 मध्ये या चित्रपटाचे शुटींग पूर्ण झाले. याआधी विराटने तब्बल दोन वर्षे कोल्हापूर येथे आपल्या तब्येतीवर मेहनत घेतली होती, त्याचे फळ आज दिसत आहे. 28 फेब्रुवारी 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.