Best Marathi films to watch (Photo Credits: File Photo)

मराठी साहित्यिक कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस. यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन (Marathi Rajbhasha Din) म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचा, साहित्याचा गौरव करण्याचा हा दिवस. राज्यात, शाळा-कॉलेजात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जातो. कथा, कांदबऱ्या, कविता, लघुकथा, निबंध हे मराठी साहित्याचे अनेक पैलू. यातून मराठी भाषेचे सौंदर्य खुलले. मात्र मराठी सिनेमाने भाषेचे सौंदर्य जनमानसात रुजवले, अनेक अमराठी लोकांपर्यंत पोहचवले. म्हणून मराठी सिनेमाचे चाहते असाल तर हे मराठी सिनेमे तुम्ही पाहायलाच हवे....

श्वास (2004)

आजोबा आणि नातू यांचे अनोखे नाते, भावविश्व दाखवणारा हा सिनेमा. नातवाला झालेला दूर्धर आजार आणि त्यामुळे त्याला गमवावे लागणारे डोळे या साऱ्यामुळे आजोबांची होणारी चलबिचल अशी या सिनेमाची कथा आहे. कॅन्सरमुळे दृष्टी गमवावी लागणार हे कळल्यावर आजोबांनी नातवाचा आनंद जपण्यासाठी केलेल्या अनेक लहान-सहान गोष्टी, त्यातून जगण्याला दिलेली सकारात्मक दृष्टी असा श्वास हा सिनेमा आहे. मराठी सिनेमा प्रेमींसाठी एक पर्वणीच. अनेक पुरस्कार विजेत्या श्वास या सिनेमाला ऑस्करमध्येही एन्ट्री मिळाली होती.

जोगवा (2009)

ग्रामीण भागातील देवदासी प्रथेवर भाष्य करणारा हा सिनेमा. एक स्त्री स्वतःला या अंद्धश्रद्धेपासून दूर सारत कशी सावरते, हे दाखवणारा हा सिनेमा आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा सिनेमा प्रत्येकाने एकदा पाहायलाच हवा.

हरिश्चंद्राची फॅक्टरी (2010)

तुम्ही खरंच जर सिनेमाप्रेमी असाल तर हा सिनेमा जरुर पहा. सिनेमाची सुरुवात करणाऱ्या दादासाहेब फाळके यांची ही कथा. यात पहिल्या मोशन पिक्चरची निर्मिती कशी झाली, त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, सिनेमा बनवण्याचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.

बालक पालक (2013)

सेक्स हा विषय भारतात तसा न बोलण्याचाच. मग पालक तर या विषयावर मुलांशी बोलणं तर दुर्मिळच. पालक-मुलं दोघंही अवघडणार. मात्र लैगिंक शिक्षक मिळणे गरजेचे आहे. मग या लैंगिक शिक्षणाला कसे गंमतीशीर वळण लागते आणि पुढे काय होते, याचे चित्रण सिनेमात केले आहे. लैगिंक विषयावर भाष्य करणारा सिनेमा असला तरी कोणताही दर्जा न खालवता, या विषयाला एक छानसा दृष्टीकोन देणारा हा सिनेमा आहे.

दुनियादारी (2013)

रोमांटिक सिनेमाचे चाहते असाल तर हा सिनेमा अवश्य पहा. मराठीतील गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा. कॉलेज जीवनातील मैत्री, प्रेम, भावना यांची सरमिसळ असलेला हा सिनेमा. यातील गाणी तर अप्रतिमच.

हेच नाही तर याशिवाय अनेक सिनेमांनी मराठी सिनेसृष्टीचे सौंदर्य वाढवले आहे. 'कट्यार काळजात घुसली,' 'नटरंग,' 'नटसम्राट,' 'एलिझाबेत एकादशी,' 'डोंबिवली फास्ट,' 'मुंबई पुणे मुंबई' असे अनेक सिनेमे अतिशय सुंदर आणि मनोरंजक आहेत. मराठी भाषेचे सौंदर्य या सिनेमांच्या माध्यमातून अनेक अमराठी लोकांपर्यंत पोहचले.