सरसेनापती हंबीरराव (Photo Credit : Facebook)

मराठी चित्रपट त्याचे विषय आणि मांडणी यांच्याबाबतीत कात टाकत आहे. गेल्या दशकभरात मराठी चित्रपटसृष्टीने अनेक नवनवीन गोष्टी ट्राय केल्या आहेत, यामुळेच आज फक्त भारतातच नाही तर जगातही मराठी चित्रपटाचा डंका वाजत आहे. काही महिन्यांपूर्वी असाच नव्या धाटणीच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौडीनंतर प्रवीण तरडे यांच्या पुढच्या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. मात्र आत ती संपली आहे, लवकरच ते शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते (Hambirrao Mohite) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत.

फेसबुकवर त्यांनी एका पोस्टद्वारे काही फोटोज पब्लिश केले आहेत. या पोस्टवरून दिसत आहे की, सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या लोकेशन रेकी आणि ड्रोन शुटिंगला सुरवात झाली असून, 2020 मध्ये एक ऐतिहासिक नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'तुटुन पडला जरी हात, नाही सोडली तलवारीची साथ....' अशी टॅगलाइन असलेले पोस्टर प्रवीण यांनी काही दिवसांपूर्वी पोस्ट केले होते. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वात भव्यदिव्य आणि महागडा चित्रपट असणार आहे.

लोकसत्ताला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, ‘मराठीत कधी दिसले नाही असे काहीतरी, व्हीएफएक्स, भव्यदिव्य सेटने परिपूर्ण असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे,’ असे प्रवीण तरडे म्हणाले होते. या भव्य चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून, संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रवीण तरडे यांच्या खांद्यावर या चित्रपटाची संपूर्ण धुरा असणार आहे कारण, या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांचे असणार आहे. महेश लिमये या चित्रपटाचे छायांकन करणार आहेत. मात्र,  हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप समजले नाही.