
प्रसाद ओक (Prasad Oak) या हरहुन्नरी अभिनेत्याने 2018 साली ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. आता प्रसाद त्याचा पुढचा चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'हिरकणी' (Hirkani) असे या सिनेमाचे नाव असून, या चित्रपटामधील बहुप्रतीक्षित ‘शिवराज्याभिषेक गीत’ (Shivrajyabhishek Geet) आज प्रसिद्ध करण्यात आले. सहा लोककलांतून साकार झालेले हे गाणे पाहिल्यावर सर्वात पहिल्यांदा जाणवतो तो याचा दृश्यात्मक प्रभाव. त्यानंतर हळू हळू एक-एक शब्द मनात रुंजी घालायला लागतात. संपूर्ण गीत पाहिल्यावर अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. प्रसाद ओक आणि त्याच्या टीमने फार वेगळ्या प्रकारे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सादर केला आहे.
शिवराज्यभिषेक गीत -
रायगडावर दुध पोहचवायला आपल्या तान्ह्या मुलाला घरी ठेऊन हिरकणी गेली होती. संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाल्यावर फक्त आपल्या लेकरासाठी मोठ्या शर्थीने तिने गड उतरला होता. इतिहासामधील ही आठवण चित्रपट रूपाने प्रसाद ओक घेऊन येत आहे. याच चित्रपटामधील शिवराज्याभिषेक गीत जे नऊ कलाकार आणि सहा लोककलांमधून सादर केले गेले आहे. या गीतामधील सर्वात महत्वाची आणि आकर्षित करून घेणारी गोष्ट म्हणजे याचे छायाचित्रण. उत्तम कॅमेरा अँगल्स, अचूक प्रकाश योजना, कला दिग्दर्शन यामुळे हे गाणे एका ठराविक उंचीवर पोहचते.
(हेही वाचा: हिंदी चित्रपटांमुळे ‘ये रे ये रे पैसा 2’ ला थिएटर्स मिळणे मुश्कील; प्रसाद ओकने सोशल मिडीयावर व्यक्त केला राग)
चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ चांदेकर, राहुल रानडे, सुहास जोशी आणि क्षिती जोग असे मराठीमधील अनेक कलाकार या गाण्यामध्ये दिसून येत आहेत. या गाण्याला अमितराज (Amitraj) यांनी संगीत दिले आहे. तर कवीभूषण (Kavibhushan) आणि संदीप खरे (Sandeep Khare) यांनी या गीताचे शब्द लिहिले आहेत. या चित्रपटाचे लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केले असून, प्रसाद ओक दिग्दर्शनाच्या भूमिकेत आहेत. येत्या 24 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.