प्रसाद ओक (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्रातील मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना शोज मिळत नाहीत म्हणून अनेक दिग्दर्शक, निर्माते लढत आहेत. यासाठी मनसे (MNS) देखील प्रयत्न करीत आहे. मात्र आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांमुळे एका चांगल्या मराठी चित्रपटाला थिएटरबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात ‘ये रे ये रे पैसा 2’ (Ye Re Ye Re Paisa 2) प्रदर्शित झाला. हा चित्रपट चांगला चालत असूनही आज दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्याने या चित्रपटाला आता थिएटर्स मिळणे मुश्कील झाले आहे. याबाबत अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) आवाज उठवला आहे.

प्रसाद ‘ये रे ये रे पैसा 2’मध्ये एक महत्वाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट थिएटर्समधून बाहेर पडल्यावर प्रसादने सोशल मिडीयावर एक पोस्ट लिहून आपला राग व्यक्त केला आहे. आज सर्वत्र स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे, मात्र मराठी चित्रपटांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. याबाबत कित्येकवेळा निदर्शने करूनही सरकार काहीच का पावले उचलत नाही ? सरकारला जाग कधी येईल? असा प्रश्न प्रसादने विचारला आहे. (हेही वाचा: प्रदर्शनाआधी 'मिशन मंगल' वादाच्या भोवऱ्यात; 'मनसे'ने केला 'या' गोष्टीला तीव्र विरोध)

पहा काय म्हणतो प्रसाद - 

सरकारला कधी जाग येणार????

भारताच्या स्वातंत्र्य दिनी

महाराष्ट्रातूनच मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय... 

"ये रे ये रे पैसा 2" हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. 

ह्या चित्रपटाने गेल्या आठवड्यात उत्तम पैसे कमवूनसुद्धा ह्या आठवड्यात ह्या चित्रपटाला थिएटर्स मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे कारण दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत, 

ही मराठी चित्रपटांची महाराष्ट्रातील अवस्था आहे आणि जर हे असंच चालू राहिलं तर मराठी निर्मात्यांनी पैसे कमवायचे तरी कसे...????

अमेय खोपकर गेली 12 वर्षे मराठी सिनेमांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडत आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना थिएटर्स मिळवून दिली आहेत आणि आज त्यांचा स्वतःचा सिनेमा असल्यामुळे ह्या चित्रपटासाठी भांडणे त्यांच्या तत्वात बसत नाही. पण आता पाळी आपली आहे आपण म्हणजेच मराठी चित्रपट सृष्टीने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे..!!

सरकारला कधी जाग येणार????

ये रे ये रे पैसा 2 या सिनेमामध्ये संजय नार्वेकर प्रमुख भूमिका साकरत आहे. सोबत आनंद इंगळे, मृण्मयी गोडबोले, अनिकेत विश्वासराव, मृणाल कुळकर्णी, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हेमंत ढोमे याने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, अमेय खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.