Sarsenapati Hambirrao New Poster: दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या चित्रपटात पिळदार शरीरयष्टीची झलक दाखवणारा कोण आहे हा अभिनेता?
Hambirrao New Poster (Photo Credits: Facebook)

लेखक, दिग्दर्शक आणि दमदार अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मुळशी पॅटर्न' ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर प्रवीण तरडें चा हा नवा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळाले त्या हंबीरराव मोहित्यांवर हा चित्रपट बनविण्यात आला आहे. नुकतंच या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. तिथीनुसार साजर्‍या केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं.

हेदेखील वाचा- Sarsenapati Hambirrao Poster: शिवजयंती निमित्त प्रविण तरडे यांनी शेअर केले 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाचे पोस्टर

या पोस्टरमध्ये पिळदार शरीरयष्टीची झलक दाखवणारा आणि सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका साकारलेला कलाकार पाठ करुन उभा आहे. पांढरं धोतरं नेसलेला, हातात दुधारी तलवार घेतलेला हा अवलिया नक्की कोण आहे याची लोकांना आता उत्सुकता लागली आहे. त्यांनी स्वत: आपल्या सोशल अकाउंटवरुन हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान,सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे. तर संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट जून २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.