MAULI First Song: रितेश देशमुखच्या माऊली सिनेमातील 'माझी पंढरीची माय' गाणे रसिकांच्या भेटीला
माऊली सिनेमातील रितेश देशमुख (Photo Credit : Youtube)

'लय भारी' या सिनेमानंतर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) 'माऊली' सिनेमातून पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'लय भारी' सिनेमातून रितेशने मराठी सिनेमात पर्दापण केले. या सिनेमाचाच माऊली हा सिक्वेन्स असणार आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता कार्तिक एकादशी निमित्त या सिनेमातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पाहा- माऊली सिनेमाचा टीझर

'माझी पंढरीची माय' असे या गाण्याचे बोल असून अजय-अतुलने यावर स्वरसाज चढवला आहे. अजय-अतुलच्या आवाजातील हे गाणे मंत्रमूग्ध करते.

'माऊली' सिनेमात रितेश पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'लय भारी' हा रितेशचा पहिलावहीला मराठी सिनेमा चांगलाच हिट ठरला होता. त्यामुळेच या सिनेमाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले असून जेनेलिया देशमुखने निर्मितीची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा 14 डिसेंबरला  रसिकांच्या भेटीला येणार आहे.