Bhadrakali First Teaser: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'भद्रकाली' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, महिला सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांची महागाथा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Bhadrakali Teaser (Photo Credits: YouTube)

Bhadrakali First Teaser: शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध निर्माता पुनीत बालन (Punit Balan) यांनी त्यांचा आगामी मराठी चित्रपट 'भद्रकाली' (Bhadrakali) चा पहिला वहिला टीजर प्रदर्शित केला आहे. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर फर्जंद, फत्तेशिकस्त यांसारखे दर्जेदार चित्रपटाचे लेखन करणारे दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी या चित्रपटाच्या लेखनाची धुरा सांभाळली आहे. मराठा साम्राज्यातील एकमेव महिला सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांची इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली महागाथा यात मांडण्यात आली आहे.

दिग्दर्शक प्रसाद ओक याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. शिवराज्याभिषेकाने प्रस्थापित झालेले मराठी साम्राज्य सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी गुजरात पावेतो भिडवले. ते आपल्या अद्वितीय पराक्रमाने राखणाऱ्या मराठा साम्राज्यातील "एकमेव" महिला सेनापती "श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे"यांची इतिहासांच्या पानांमध्ये दडलेली महागाथा यात मांडण्यात आली असल्याचे त्याने म्हटले आहे.हेदेखील वाचा- 'जंगजौहर' चित्रपटाचे नाव बदलले, येत्या 10 जूनला 'पावनखिंड' या नावाने सिनेमा होणार प्रदर्शित

मुळशी पॅटर्न आणि जग्गु आणि ज्युलियेट चे निर्माते पुनीत बालन यांनी भद्रकालीची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रसाद ओक हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. या जबरदस्त तांत्रिक टीमसह संगीताचे जादूगार अजय-अतुल हे या चित्रपटाला संगीत देणार आहे. त्यामुळे एकूण या चित्रपटाची तांत्रिक टीम पाहता एक दमदार, भव्यदिव्य अशी ऐतिहासिक कलाकृती घडणार याबाबत तिळमात्र शंका नाही.

पुनीत बालन स्टुडिओज प्रस्तुत भद्रकाली हा चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कोण कलाकार असणार तर श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे ही भूमिका कोण अभिनेत्री साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र प्रेक्षकांना लवकरच एक दमदार कलाकृती पाहायला मिळणार हे मात्र नक्की. त्यामुळे सर्वांना आतुरता आहे ती या चित्रपटाची.