Nishikant Kamat (Photo Credits: Twitter)

2020 मध्ये भारताने अनेक दिग्गज लोकांना गमावले आहे. यामध्ये बॉलिवूडचे फार मोठे नुकसान झाले आहे. आता माहिती मिळत आहे की, मराठी, हिंदी, तमिळ अशा अनेक भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले आहे. 50 वर्षीय निशिकांत कामत यांना जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील एआयजी इस्पितळात भरती करण्यात आले. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचे संक्रमण झाल्याचे आढळले होते. आज सायंकाळी साधारण साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

निशिकांत कामत यांचा जन्म 17 जुलै 1970 रोजी दादर, महाराष्ट्र इथे झाला. कामत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांना तीव्र ताप होता आणि थकवा जाणवत होता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना लिव्हर सिरिऑसिस आहे. कालपासून त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता आणि रक्तदाबही कमी झाला होता. 17 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ही बातमी समजताच इंडस्ट्रीमधील अनुराग कश्यप, रणदीप हूडा, आर माधवन, रितेश देशमुख, अजय देवगण, सई ताम्हणकर, केदार शिंदे अशा अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, निशिकांत कामात यांनी 2004 सालच्या ‘हवा आने दे’ या हिंदी चित्रपटात प्रथम अभिनय केला. त्यानंतर ‘सातच्या आत घरात’ मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. पुढे ‘डोंबिवली फास्ट’ द्वारे त्यांनी दिग्दर्शकीय पदार्पण केले. व नंतर एवनों ओरुवन, मुंबई मेरी जान, फोर्स, लई भारी, दृश्यम्, रॉकी हँडसम अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले.