अभिनयाच्या विशिष्ट शैलीने आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) हीने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच स्मिता तांबे नाट्य कलाकार विरेंद्र द्विवेदीसोबत (Virendra Dwivedi) विवाहबद्ध झाली. हा विवाह दोन पद्धतीने पार पडला. मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय रितीरिवाजात स्मिता-विरेंद्र विवाहबद्ध झाले.
या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नववधूच्या रुपात स्मिता अतिशय सुंदर दिसत आहे.
या विवाहसोहळ्याला अभिनेत्री आणि स्मिताची खास मैत्रिण रेशम टिपणीस उपस्थित होती. या आनंदी क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत रेशमने स्मितासाठी खास संदेश लिहिला आहे. "स्मिता, तुला वैवाहिक जीवनाच्या खूप शुभेच्छा. तुला माझ्या वाट्यातील आनंदही मिळो." रेशमची ही पोस्ट दोघींमधील घट्ट मैत्री प्रतीत करते.
'जोगवा,' '72 मैल,' 'देऊळ' अशा सिनेमातून आणि विविध मालिकांमधून स्मिताने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मराठीसोबतच 'सिंघम रिटर्न्स,' 'रुख' अशा हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे.