Hawahawai Marathi Movie: मल्याळम अभिनेत्री 'निमिषा सजयन'ची मराठीत एन्ट्री, 'हवाहवाई' चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला
(Photo Credit - Insta)

"द ग्रेट इंडियन किचन" (The Great Indian Kitchen) या बहुचर्चित मल्याळम (Malayalam) चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री निमिषा सजयन (Nimisha Sajayan) मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. महेश टिळेकर (Mahesh Tilekar) दिग्दर्शित आगामी "हवाहवाई" (Hawahawai) या चित्रपटात ती दिसणार असून, हा चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनचे विजय शिंदे यांनी "हवाहवाई" चित्रपटाची निर्मिती केली आहे. "द ग्रेट इंडियन किचन" या चित्रपटातील निमिषा सजयनचा अभिनय आवडल्याने महेश टिळेकर यांनी तिला मराठीत काम करण्याविषयी विचारणा केली. त्याला निमिषाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

अक्षय कुमार, जयाप्रदा, हेलन या हिंदी कलाकारांनी महेश टिळेकर यांच्या आधीच्या  चित्रपटांमधून मराठीत पदार्पण केलं होतं. त्याशिवाय "बाहुबली" या चित्रपटाचे कॅमेरामन सेन्थील कुमार यांना पहिली संधी महेश टिळेकर यांनी त्यांच्या "आधार" चित्रपटाद्वारे दिली होती. "द ग्रेट इंडियन किचन" या चित्रपटासह निमिषाच्या नायट्टू, मालिक या चित्रपटांतील अभिनयाचं देखील कौतुक झालं आहे.

वेगळे विषय आणि कलाकारांच्या सहज अभिनयामुळे मल्याळम चित्रपटांचा देशात आणि परदेशातही प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. निमिषाचा बहुचर्चित 'द ग्रेट इंडियन किचन" हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनीही आवर्जून पाहिलेला आहे. "हवाहवाई" या चित्रपटातील भूमिका तिला साजेशी असल्यानं निमिषाला मराठीत पहिला ब्रेक देण्याचं ठरवलं असं महेश टिळेकर यांनी सांगितलं. (हे ही वाचा Dharmaveer: प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपटात उलगडणार शिवसैनिक आनंद दिघे यांचा जीवनपट; पहा मोशन पोस्टर)

साऊथचे चित्रपट इतर भाषेत भाषांतरीत होऊन प्रदर्शित होत असताना, साऊथ मधील उत्तम अभिनय करणाऱ्या कलाकारांना मराठी चित्रपटात आणण्याचा नवा ट्रेण्ड महेश टिळेकर यांनी हवाहवाई सिनेमातून सुरू केला आहे. निमिष सजयनसह मराठीतील काही प्रसिद्ध कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका असून अनेक नवीन कलाकारांनाही या चित्रपटात संधी देण्यात आली आहे