International Women's Day: मराठी चित्रपटसृष्टीतील 5 महिला दिग्दर्शक
5 female directors from Marathi cinema | (Photo credit: archived, edited, symbolic images)

International Women's Day: मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Cinema) अनेक महिलांचे योगदान आहे. परंतू, यातील बहुतांश महिलांचे योगदान हे कलाकार (अभिनय, गायन) म्हणूनच राहिले आहे. खूप कमी महिला आहेत, ज्यांनी यशस्वी संगितकार, दिग्दर्शिका, निर्माती म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला. आजच्या बदलत्या काळात चित्रपटसृष्टीही बदलते आहे. अनेक महिला चित्रपटसृष्टीतील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पडाताना दिसत आहेत. तरीही त्यांचे प्रमाण आजही ते प्रमाण म्हणावे तितके अधिक नाही. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातो आहे. या दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा आढावा जगभरातील प्रसारमाध्यमांकडून घेतला जातो आहे. या पार्श्वभूमिवर मराठी चित्रपटातील महिला दिग्दर्शांकांच्या (Female Directors From Marathi Cinema) कार्यावर टाकलेला हा एक अल्पसा कटाक्ष.

स्वप्ना वाघमारे जोशी ( Swapna Waghmare Joshi)

Swapna Waghmare Joshi | (Photo Credit: Facebook)

सुरुवातीच्या काळात टीव्ही मालिका दिग्दर्शक आणि निर्माता अशी ओळख असलेल्या स्वप्ना वाघमारे जोशींनी चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल ठेवले. काही काळ टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केल्यानंतर त्यांनी 'मितवा', 'लाल इश्क', 'फुगे', 'तुला कळणार नाही' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांना प्रेक्षकांनी फारशी पसंदी दिली नाही. परिणामी हे चित्रपट आपटले. परंतू, या निमित्ताने महिला दिग्दर्शक म्हणून स्वप्ना वाघमारे जोशी यांची ओळख बनली.

मृणाल कुलकर्णी (Mrinal Dev-Kulkarni)

Mrinal Dev-Kulkarni | (Photo Credit: Facebook)

मराठी चित्रपट रसिकांना मृणाल कुलकर्णी हे नाव प्रामुख्याने अभिनेत्री म्हणून माहिती आहे. परंतू, त्या दिग्दर्शिकाही आहेत. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' या चित्रपटाच्या माध्यमांमधून त्यांनी दिग्दर्शनात क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या 'रमा माधव' चित्रपटाला समीक्षकांचे जोरदार कौतुक लाभले. 'ती आणि ती' चित्रपटाचेही त्यांनी दिग्दर्शन केले आहे. पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे अशी स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळते. वयाच्या सोळाव्यावर्षापासूनत्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. टीव्ही मालिकांपासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.

मनवा नाईक (Manava Naik)

Manava Naik | (Photo Credit: Facebook)

मनवा नाईक हे नाव सुद्धा प्रेक्षकांना अभिनेत्री म्हणूनच प्रामुख्याने माहिती आहे. तिने 'पोर बाजार' चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर, 'क्षणभर विश्रांती', 'शहाणपण देगा देवा', 'काकस्पर्श', 'नो एन्ट्री - पुढे धोका आहे' या चित्रपटातून कालाकार म्हणून काम केले आहे. (हेही वाचा, International Women's Day: महिलादिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या स्त्रीला देऊ शकता अशी काही खास भेट)

क्रांती रेडकर (Kranti Redkar)

Kranti Redkar | (Photo Credit: Facebook)

क्रांती रेडकर ही सुरुवातीला 'जत्रा' चित्रपटातील 'कोंबडी पळाली' या गाण्यावार आयटम सॉन्गमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. 'काकण' या चित्रपटाचे तिने दिग्दर्शनही केले आहे. 'सून असावीअशी' (2000) चित्रपटातून चित्रपट अभिनयाला प्रारंभ केलेल्या क्रांतीने काही हिंदी सिनेमातही काम केले आहे. 'गंगाजल' हा सिनेमा त्यापैकी एक.

प्रतिमा जोशी (Pratima Joshi)

Pratima Joshi | (Photo Credit: Facebook)

'आम्ही दोघी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रतिमा जोशी यांनी चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. मुळात त्या यशस्वी लेखिका आहेत. मराठी आणि हिंदी भाषेत त्यांनी केलेले लेखन प्रसिद्ध आहे. त्या लेखिका आहेत परंतू त्यासोबतच त्या अभिनेत्री आणि ड्रेस डिझायनरही आहेत. 'दुसरी गोष्ट' या चित्रपटाचे त्यांनी सह दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.