
अनेक हिंदी,अमराठी कलाकारांना आजकाल मराठी सिनेसृष्टीबद्दल कमालीचं आहे. बिग बी अमिताभ बच्चनपासून अनेक कलाकार निर्मिते, सादरकर्ते किंवा दिग्दर्शकाच्या पावलांनी मराठीत आला आहे. लवकरच अभिनेता के.के.मेनन आणि राजश्री सचदेव ही अमराठी कलाकारांची जोडी मराठी सिनेमात झळकणार आहे. 'एक सांगायचयं..' या मराठी सिनेमातून के.के.मेनन आणि राजश्री पदार्पण करणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला आहे.
तरूण पिढी आणि पालकांमध्ये हरवत चाललेल्या संवादातून निर्माण होणार्या समस्यांवर या सिनेमातून भाष्य करण्यात आलं आहे. के.के.मेनन एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे.
लोकेश गुप्तेचं दिग्दर्शनात पदार्पण
वादळवाट मालिकेतील 'ACP समर अजिंक्य' या भूमिकेतून घराघरात पोहचलेला आणि आजही रसिकांच्या मनात या भूमिकेमुळे लक्षात असलेला लोकेश गुप्ते आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'एक सांगायचयं..' हा लोकेश गुप्ते दिग्दर्शित पहिला सिनेमा आहे. दिग्दर्शनासोबतच त्याने एडिटिंग आणि सिनेमाचं लेखनही केलं आहे. लोकेशची पत्नी आणि अभिनेत्री चैत्राली गुप्तेने या सिनेमासाठी वेशभूषाकाराची भूमिका सांभाळली आहे.
राजश्री सचदेव, के.के.मेनन यांच्यासोबत या सिनेमात पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, शुभवी गुप्ते, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी हे कलाकार झळकणार आहेत.
'एक सांगायचयं..' हा सिनेमा 16 नोव्हेंबरला रीलिज होणार आहे.