सा क्रिएशन्स निर्मित आणि डॉ. निवेदिता एकबोटे प्रस्तुत "दिल दिमाग और बत्ती" हा मराठी चित्रपट आता २२ एप्रिल ऐवजी ६ मे २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतीच याची घोषणा चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियाद्वारे केली आहे. प्रदर्शित झालेले पोस्टर्स, टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांना ८० च्या दशकातील इस्टमन कलर चित्रपटांच्या काळात घेऊन जाण्यात यशस्वी ठरले आहेत. सिनेमामध्ये सिनेमा असे दुहेरी मनोरंजन बघायला मिळणाऱ्या "दिल दिमाग और बत्ती" या चित्रपटातून अभिनेता सागर संत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. नवोदितांबरोबरच अनुभवी तारे तारकांच्या अभिनयाने सजलेला "दिल दिमाग और बत्ती" हा फूल टू धमाल चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन करत 80s ची मजा २०२२ मध्ये देणार आहे.
"दिल दिमाग और बत्ती" या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांचे संगीत असून यात विविध धाटणीची चार गाणी आहेत. गीतकार हृषीकेश गुप्ते यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहीत राऊत, जान्हवी प्रभू अरोरा, मुग्धा कराडे यांचा आवाज लाभला आहे.सा क्रिएशन्स ची पहिलीच निर्मिती असलेल्या "दिल दिमाग और बत्ती" या मराठी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते आहेत. (हे देखील वाचा: Irsal Marathi Movie: बहुचर्चित 'इर्सल' चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला)
सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे अशी तगडी स्टारकास्ट असून छायांकन सलील सहस्त्रबुद्धे यांचे आहे. "दिल दिमाग और बत्ती" ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.