मराठी सिनेसृष्टीतील एक जबरदस्त अभिनेता, अवलिया, कॉमेडी कलाकार म्हणून दादा कोंडके (Dada Kondke) यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे जवळपास सर्वच सिनेमे हिट ठरले. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसवले.
मराठी सिनेसृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि निर्माते दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 साली झाला. 'सामान्य माणसाचा हिरो' म्हणून त्यांना लोकप्रियता मिळाली. कोंकडे यांचे 9 सिनेमे 25 आठवडे सिनेमागृहात चालले. या विक्रमाची नोंद चक्क 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये करण्यात आली. 14 मार्च 1998 साली मुंबईतील दादर येथे दादा कोंडके यांनी अखेरचा श्वास घेतला. कॉमेडीचा बादशाह ते राजकारणी व्यक्तीमत्त्व असलेल्या दादा कोंडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी-
दादा कोंडके यांचे पूर्ण नाव कृष्णा कोंकडे होते. त्यांचे बालपण काहीसे गुंडागर्दीच्या वातावरणात गेले. त्यामुळे त्यांच्यातही ते गुण अवतरले. सुरुवातीला ते दगड, विटा, बॉटल्सचा वापर करुन दंगे करत असतं. त्यानंतर ते राजकारणातही सक्रीय झाले. शिवसेनेशी जोडले गेल्यानंतर मोर्चे, रॅली यात ते काम करु लागले.
कोंडके यांचे 'विच्छा माझी पूरी करा' हे नाटक अत्यंत गाजले. हे नाटक काँग्रेसविरोधी होते, असे म्हटले जाते. या नाटकाचे तब्बल 1100 प्रयोग झाले. 1975 साली आलेले 'पांडू हवलदार' हा सिनेमा चांगलाच चर्चेत होता. यात त्यांनी मुख्य भूमिका निभावली होती. या सिनेमानंतर हवलदारांना 'पांडू' नावाने हाक मारण्याची पद्धत सुरु झाली. त्यानंतर 'सोंगाड्या', 'आली अंगावर' यांसारखे त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले.
सहज सुंदर अभिनयासोबत डबल मिनिंग कॉमेडी करत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या सिनेमांची नावे सेसॉर बोर्डात नेहमीच वादाचा विषय ठरली. मात्र त्या नावांनी कोणीही कात्री लावली नाही.
दादा कोंडके यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबईच्या भारतमाता सिनेमागृहात त्यांचे सिनेमे दाखवण्याची परंपरा सुरु करण्यात आली.